द्वैत आणि अद्वैत ही काय भानगड आहे? भगवंतापासूनच सर्व झाले. एकापासून दोन झाले. आपण मूळ स्वरूपापासून बाजूला झालो म्हणून द्वैत आले. मायेमध्ये सापडले नाही म्हणजे अद्वैतात राहता येईल. माया कल्पनेचीच झाली; तिला कल्पनेनेच मारावी. एकच करावे : अद्वैतात जे राहिले त्यांच्या नादी आपण राहावे. भगवंताचे होण्याकरिता, ज्याने मी वेगळा झालो ते सोडावे. ज्याच्यापासून माया निर्माण झाली, त्यालाच शरण जावे. माया तरी भगवंतामुळेच झाली. जो भगवंताचा होतो, त्याला माया नाही बाधत. मायेचा जोर संकल्प – विकल्पात आहे. अखंड स्मरणात राहावे म्हणजे नाही माया बाधत. भगवंताचे नाम हे स्थिर आहे, पण रूप मात्र सारखे बदलते. प्रत्यक्ष साकाररूप हेच काही रूप नव्हे; जे जे आपल्या कल्पनेमध्ये येऊ शकेल ते ते सर्व रूपच होय. भगवंताच्या नामात मोबदल्याची अपेक्षा नाही, म्हणून ते पूर्ण आहे. समाधान हा पूर्णत्वाचा स्वभाव होय. म्हणूनच, जे पूर्ण नाही ते असमाधान. भगवंताकडून येणारी शांती हेच समाधान होय आणि हेच पूर्णपण आहे. जे शास्त्र समाधान देते तेच शास्त्र खरे होय आणि ज्याने शांती आणि समाधानाचा लाभ होतो तोच खरा धर्म होय. धर्म म्हणजे नीती आणि अध्यात्म यांचा संयोगच.
जो दुसऱ्याच्या हिताकडे न पाहता आपल्या हिताकडेच पाहतो तो स्वार्थीच होय. सुख व्हावे ही मनुष्याला इच्छा असल्यामुळे अस्वस्थपणा येतो. या अस्वस्थतेमधून तळमळ निर्माण होते. या तळमळीमुळे जगाच्या सर्व सुधारणा बाहेर पडतात. पण ह्या सुधारणा जितक्या जास्त होतात, तितके मनुष्याला दु:ख जास्तच होते. जी विद्या केवळ नोकरीचे साधन आहे, ती अपूर्णच असते. असली विद्या पोटापुरतीच समजावी. ती समाधान देऊ शकणार नाही. समाधान देणारी विद्या निराळीच आहे. म्हणून लौकिक विद्येला फार महत्त्व देऊ नये. एखादे वेळी आपल्याला असा संशय येतो की, जगात कुठे सुख, समाधान आणि आनंद आहे का? पण तो संशय बरोबर नाही कारण ज्या गोष्टी जगात नाहीत त्यांचे नावच कसे निघेल? असमाधान याचा अर्थच ‘समाधान नाही ते.’ यावरून असे स्पष्ट दिसते की, आधी समाधान असलेच पाहिजे. दिवाळीमध्ये, सुखाचे जे असेल ते आज करतो आणि दु:खाचे जे असेल ते आपण उद्यावर टाकतो. ह्याचा अर्थ असा की, आपली काळजी नाहीशी झालेली नसूनही आपण आजचा दिवस चांगला म्हणजे काळजीविरहित घालवितो. उद्या पुन्हा काळजी आहेच! पण जो भगवंताचे स्मरण ठेवील त्याला काळजी केव्हाच नसते. ज्याची प्रत्येक कृती रामाच्या स्मरणात होते तोच खरा रामराज्यात राहतो.
– ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…