लासलगाव (वार्ताहर) : लासलगाव-विंचूर रस्त्यावर मंजुळा पॅलेससमोर दोन मोटारसायकलींची समोरासमोर जोरदार धडक होऊन एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. या अपघातातील दोन्ही गंभीर जखमींवर लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नासिक येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार श्रावण सोमनाथ पवार रा. विंचूर हा मोटरसायलवरून विंचूरकडून लासलगावच्या दिशेने येत असताना तसेच अमोल भाऊलाल भालेराव व रवींद्र नामदेव जाधव दोन्ही राहणार लासलगाव हे मोटरसायलवरून लासलगावकडून विंचूरच्या दिशेने जात असताना मंजुळा पॅलेससमोर दोन्ही मोटारसायकलस्वारांमध्ये समोरासमोर धडक झाली. त्यात श्रावण सोमनाथ पवार हा जागीच ठार झाला. तर अमोल भाऊलाल भालेराव, रवींद्र नामदेव जाधव हे दोन्ही गंभीर जखमी झाले.
अपघाताची खबर मिळताच लासलगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी योगेश शिंदे त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लासलगांव ते विंचूर या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यावर अनेकवेळा अपघात होत असल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.
लासलगाव ते विंचूर रस्त्यावर मोठया प्रमाणावर वाहनांची रहदारी असल्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. याच ठिकाणी मागे रिक्षा व हायवा यांच्यात अपघात होऊन ५ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या रस्त्याचे चौपदरीकरण तातडीने करण्यात यावे, तसेच गतिरोधक बसविण्यात यावे.– महेंद्र हांडगे, सामाजिक कार्यकर्ते, लासलगाव