मुंबई : मेट्रो-३ ही मुंबईची नवीन लाईफलाईन आहे. मुंबईकरांसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. वाद-विवाद झाले नसते तर मार्च २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला असता. कारशेडच्या वादामुळे प्रकल्पाला वेळ लागला. हा वाद पर्यावरणापेक्षा राजकिय अधिक झाला आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी निर्णय घेतला नसता तर आणखी ४ वर्षे मेट्रो खोळंबली असती, असे शिंदेंचे कौतुक करत फडणवीसांनी उध्दव ठाकरेंना टोला लगावला.
कुलाबा-वांद्रे-सिप्झ मुंबई मेट्रो ३ आरे- सारीपूतनगर ते मरोळ नाका ट्रॅकवर आज चाचणी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. मेट्रोला हिरवा कंदील दाखवल्यानंतर फडणवीसांनी ठाकरेंवर निशाणा साधला. मेट्रोला कुणी थांबवू शकत नाही, असा सिग्नल देत इशाराही दिला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, सुप्रीम कोर्टाने या प्रकल्पाला परवानगी दिली आहे. सर्वप्रकारच्या पर्यावरणाचा सर्वांगिक अभ्यास करून कोर्टाने परवानगी दिली. पर्यावरणपूरक प्रकल्प असल्याचा हरित लवादाचा निर्णय आहे. यामध्ये १७ लाख लोक या मेट्रोने प्रवास करतील. तर ७ लाख गाड्या रस्त्यावरून कमी होतील. प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो महत्त्वाची आहे. प्रदुषणामुळे मुंबईकर रोज थोडे-थोडे मरत आहेत आणि आपण राजकारण करत आहोत, यापेक्षा मोठं दुर्दैवं आणखी काय असू शकते, असा टोला फडणवीसांनी उध्दव ठाकरेंना लगावला.
कांजूर कारशे़डमध्ये पैसे, वेळ वाया गेला असता. कारशेड हा इगोचा विषय नाही. कांजूरमधील कारशेड अव्यवहार्य आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. एकनाथ शिंदेंनी योग्य वेळी निर्णय घेतल्याने हे शक्य झाले, असे म्हणत त्यांनी शिंदेंचे आभार मानले. तर अश्विनी भिडे यांच्या चमूचेही कौतुक केले. यावेळी जपान सरकारचेही त्यांनी आभार मानले.