Saturday, March 22, 2025
Homeमहामुंबई१.५० लाखांहून अधिक ज्येष्ठांनी घेतला एसटी मोफत प्रवासाचा लाभ

१.५० लाखांहून अधिक ज्येष्ठांनी घेतला एसटी मोफत प्रवासाचा लाभ

मुंबई (प्रतिनिधी) : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास करण्याच्या घोषणेनंतर ज्येष्ठांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. गेल्या चार दिवसांत २६ ते २९ ऑगस्ट, २०२२ दरम्यान राज्यभरातून सुमारे १ लाख ५१ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. राज्य सरकारच्या घोषणेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.

राज्य शासनाने ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास तर ६५ ते ७५ वर्षादरम्यानच्या नागरिकांनाही सर्व सेवांमधून ५० टक्के सवलतीमध्ये प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात केली होती. २५ ऑगस्ट, २०२२ रोजी माननीय मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठांना मोफत प्रवास योजनेसाठी प्रमाणपत्राचे वितरण आणि योजनेचा शुभारंभ झाला होता. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या २६ ऑगस्ट पासून मोफत प्रवासाला सुरुवात झाली होती. एसटी महामंडळाने या योजनेला ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ हे नाव दिले असून या योजनेतंर्गत ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत कुठेही मोफत प्रवास करता येणार आहे.

या योजनेचा शुभारंभ झाल्यानंतर २६ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट, २०२२ या चार दिवसांच्या कालावधीत राज्यभरात १ लाख ५१ हजार ५५२ ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे. प्रवासादरम्यान आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र तसेच केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे, असे चन्ने म्हणाले. दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाकडे ३४ लाख ८८ हजार ज्येष्ठ नागरिकांनी स्मार्ट कार्डासाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या १४ लाख ६९ हजार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -