बोईसर : तारापूर बोईसर आणि परीसरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याच्या नावाखाली एमआयडीसीकडून निव्वळ धूळफेक सुरू आहे. मागील दोन आठवड्यापासून पावसाने ब-यापैकी उघडीप दिली असल्याने बोईसर आणि औद्योगिक परीसरातील रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य पसरले आहे.
गणेशोत्सव तोंडावर येताच एमआयडीसीने बोईसर नवापूर रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरवात केली आहे. मात्र हे खड्डे भरण्यासाठी डांबर न वापरता फक्त दगडी ग्रीड पावडरचा वापर केला जात असून वा-यामुळे आणि वाहनांच्या ये-जा करण्यामुळे ही ग्रीड पावडर खड्ड्याच्या बाहेर पडून हवेत उडून वाहनचालकांच्या नाकातोंडात जात आहे. त्याचप्रमाणे रस्त्याच्या शेजारील दुकाने आणि घरांवर ही ग्रीड पावडर साचून नागरीकांना त्याचा त्रास होत आहे.त्यामुळे खड्डे भरण्याच्या नावाखाली एमआयडीसीकडून फक्त धूळफेक केली जात असल्याचा संताप वाहनचालक आणि प्रवाशांकडून व्यक्त केला जात आहे.
पावसामुळे बोईसर-नवापूर रस्ता हा प्रचंड खड्डेमय झाला असून यामुळे वाहनचालकांना गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागते. बोईसर आणि औद्योगिक वसाहतीमधील फेब्रुवारी महीन्यात दुरूस्ती केलेल्या रस्त्यांचे जून महीन्यात पहील्या पावसाला सुरवात होताच खड्डे पडून पितळ उघडे पडले होते. बोईसर नवापूर या मुख्य रस्त्यावरील मधुर हॉटेल चौक, धोडीपूजा आणि अवधनगर या ठिकाणी रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. तर मुकुट टॅंक पेट्रोल पंपाजवळील रस्ता सुद्धा उखडला आहे. रस्त्यावर पडलेल्या भल्यामोठ्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचून त्याचा अंदाज न आल्यामुळे अनेक दुचाकीचालक आणि लहान वाहनांचे गाडी आदळून अपघात होत आहेत.
सतत अवजड वाहनांची वाहतूक सुरू असलेल्या या रस्त्यांवर लहान दुचाकी आणि लहान वाहनचालकांना अक्षरक्ष जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अशा परीस्थितीत रस्त्यांची देखभाल दुरूस्ती करणा-या तारापूर एमआयडीसी ने खड्डे भरण्यासाठी टाकलेली दगडी ग्रीड पावडर कुचकामी ठरत असून उलट त्याचा वाहनचालक आणि नागरीकाना त्रास होत आहे. त्यामुळे खड्डे भरण्यासाठी योग्य पद्धतीचा वापर करण्याची मागणी होत आहे.