शिवसेना-शिंदे गटाच्या वादात देशपांडेच्या ट्विटने चर्चेला उधाण
मुंबई : शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरून शिवसेना व शिंदे गटात जोरदार घमासान सुरू असतानाच आता या वादात मनसेने उडी घेतली आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या फोटोसह ‘वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो’, हे वाक्य ट्विट करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
'शिवतीर्थ'वर होणारा दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणे ! आजच्या घडीला दोनही गटांचे त्यावरून घमासान चालू आहे पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे "वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो" pic.twitter.com/bkTLZaEXMm
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 30, 2022
संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे की, शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणे! आजच्या घडीला दोन्ही गटांमध्ये त्यावरून घमासान चालू आहे. पण, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो.
बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणारे आणि शिवसेनेला शह देणारे एकमेव नाव म्हणजे राज ठाकरे. त्यामुळेच मुंबई महापालिकेत सत्तांतर करण्यासाठी भाजप हे राज ठाकरेंचे अस्त्र वापरणार, हे आता स्पष्ट होत आहे. त्यामुळेच भाजप आणि राज ठाकरेंमधील सख्य दिवसेंदिवस घट्ट होत आहे. भाजपचे अनेक प्रमुख नेते राज ठाकरेंच्या गाठीभेटी घेत आहेत. या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांनी थेट दसरा मेळाव्यावरून उद्धव ठाकरेंना लक्ष्य केल्यामुळे यापुढे मनसेच्या टार्गेटवर कोण असणार, हे आता स्पष्ट होत आहे.
एकनाथ शिंडे यांच्या बंडानंतर होणाऱ्या या दसरा मेळाव्याला शिवसेनेकडून प्रचंड महत्त्व दिले जात आहे. दसरा मेळाव्यातून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंकडून केला जाणार आहे. तर, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा करणाऱ्या शिंदे गटाकडून हा मेळावाच हायजॅक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसत आहे. ठाकरे व शिंदे या दोन्ही गटांनी दसरा मेळावा आमचाच होणार, असा दावा केला आहे.
उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी मुंबई पालिकेकडे दोन वेळा अर्ज केला आहे. मात्र, पालिकेकडून अद्याप शिवसेनेला परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारकडून दसरा मेळाव्याबाबत सेनेची कोंडी केली जात असल्याचे दिसत आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नियमानुसार परवानगी दिली जाईल, असे सांगितले आहे. तर उद्धव ठाकरे यांनी परवानगीबाबत मला काही माहित नाही पण शिवतीर्थावर मेळावा आमचाच होणार, असे ठणकावून सांगितले आहे.