भारतीयांना दोन गोष्टींचे खास आकर्षण आहे. त्याच दोन गोष्टींवर भारतीय लोक तासनतास न थकता बोलू शकतात, ठामपणे मत मांडू शकतात. त्या गोष्टींवर आपल्यात अगाध ज्ञान आहे, असा भारतीयांना विश्वास असतो. त्या दोन गोष्टी म्हणजे राजकारण आणि क्रिकेट खेळ. आजमितीला जगामध्ये शेकडो देश असले तरी क्रिकेट हा खेळ मूठभर देशांमध्ये खेळला जात आहे. हा खेळ ऑलिम्पिक स्तरावर खेळला जात नसला तरी या खेळामुळे मोठ्या प्रमाणावर अर्थकारणाला चालना मिळत आहे. क्रिकेट खेळणाऱ्या देशांच्या क्रिकेट मंडळांचा विचार केला, तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ सर्वाधिक श्रीमंत आहे.
आशिया खंडामध्ये क्रिकेटची लोकप्रियता असल्याने भारतासोबत पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश या देशांमध्ये क्रिकेटवेड्यांची संख्या अधिक आहे; परंतु क्रिकेट खेळावर प्रेम करणाऱ्या आम्हा भारतीयांची बरोबरी आगामी काही दशकांमध्ये नाही तर शतकांमध्येही कोणी करू शकणार नाही. या देशात सचिन तेंडुलकर, सुनील गावस्करसह अनेक खेळांडूना देवासम पूजले जात आहे. कपिलदेव त्यांच्या कसोटी खेळाच्या अखेरच्या काळात तीन टप्पा चेंडू टाकत असताना न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज रिचर्ड हॅडलीचा ४३१ बळींचा विक्रम मोडण्यासाठी कपिलदेव खेळला, पण त्याच्यावर कोणी टीका केली नाही. आजही या देशात युवराजसिंह तसेच रवी शास्त्रीने मारलेल्या सलग सहा षटकारांची आणि संदीप पाटील यांनी डेनिस लीलीसारख्या वेगवान गोलंदाजाला मारलेल्या सहा चौकारांची चवीने चर्चा होत असते. दोन वेळा विश्वचषक, एक वेळा ट्वेटी-२०चा जिंकलेला चषक यांसह अनेक चषके भारतीयांनी मिळविलेली आहेत.
अनेक विक्रमांवर भारतीयांनी आपले नाव कोरलेले आहे. भले श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनने सर्वांधिक बळी मिळविले असले तरी डोक्याला पट्टी लावून जखमी अवस्थेत खेळून भारताला विजय मिळवून देणारा तसेच एकाच सामन्यामध्ये सलग दहा बळी मिळविणारा अनिल कुंबळेच आम्हाला अधिक जवळचा आहे. ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नला सचिन तेंडुलकर स्वप्नात येऊन फलदांजी करताना दिसायचा. पाकिस्तानच्या अब्दुल कादिरला खेळताना नवज्योत सिद्धू कधी क्रीझमध्ये खेळताना फारसा दिसलाच नाही. चीनच्या पोलादी भिंतीहून अधिक भिंत असलेला राहुल द्रविडचा खेळ व संयम कोणी विसरणार नाही, आशिया चषक सध्या सुरू झालेला आहे. शारजाची भूमी भारतीय खेळाडूंसाठी माहेरघरच आहे. भारत-पाकिस्तान या दोन देशांचा सामना असल्यावर मैदानातील गर्दी व दोन्ही देशांचे मोठ्या प्रमाणावर झळकणारे झेंडे पाहिल्यावर दोन्ही देशांतील खेळाडूंवर कमालीचा दबाव असतो. शारजाच्या मैदानावर भारतीय संघाने अनेक स्पर्धा व अनेक महत्त्वाचे सामने जिंकले असले तरी १९८४ साली याच ठिकाणी अखेरच्या चेंडूवर विजयासाठी चार धावा काढायच्या असताना भारताच्या चेतन शर्माच्या फुलटॉस बॉलवर पाकिस्तानच्या जावेद मियॉंदादने लगावलेल्या षटकाराच्या आठवणी भारतीय आजही विसरत नाहीत. रविवारी आशिया चषकामध्ये भारत-पाकिस्तानचा सामना झाला. भारत-पाकिस्तानमधील क्रिकेट सामन्याला नेहमीच ‘हायव्होल्टेज’ याच नावाने संबोधले जाते. या मैदानावर खेळण्यासाठी उतरताना जुना हिशोब चुकता करण्याची जिद्द भारतीय खेळाडूंमध्ये होती. कारण याच मैदानावर १० महिन्यांपूर्वी पाकिस्तान संघाने भारतीय संघाचा टी-२०च्या विश्वचषकामध्ये १० विकेटने दणदणीत पराभव केला होता. त्या पराभवाचा त्याच मैदानावर वचपा काढण्याची संधी भारतीय संघाला आशिया चषकाच्या निमित्ताने चालून आली होती आणि त्या संधीचे सोने करत भारताने पराभवाची त्याच मैदानावर परतफेड केली.
भारत-पाक सामन्यातील खरा चतुरस्त्र हिरो ठरला तो अष्टपैलू हार्दिक पंड्याच. गोलदांजीसह फलंदाजीतही पंड्याने चमक दाखविल्याने पाकिस्तानला पराभूत करणे भारताला शक्य झाले. निर्णायक वेळी पंड्याने पाकिस्तानच्या विकेट काढल्या व फलदांजीमध्ये विकेट न गमविता अंतिम षटकातील तिसऱ्या चेंडूवर षटकार मारताना भारताला पंड्याने विजय मिळवून दिला. मैदानावर जरी हार्दिक पंड्यामुळे विजय आटोक्यात आला असला तरी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा जगभरातील क्रिकेट रसिकांची मने त्यांच्या एकाच वाक्याने जिंकून गेला. भारताच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत पाकिस्तानच्या धावसंख्येला खीळ बसवली. त्यामुळे त्यांना भारतापुढे १४८ धावा ठेवता आल्या. हे आव्हान माफक वाटत होते. त्यामुळे भारत आता एकतर्फी विजय साकारेल, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण तसे घडले नाही. कारण पाकिस्तानच्या गोलंदाजांनीही दमदार कामगिरी केली आणि त्यामुळेच हा सामना रंगतदार झाला. हा सामना रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्या यांनी भारताच्या बाजूने फिरवला. रोहितने सामना संपल्यावर एका वाक्यात पाकिस्तानच्या चाहत्यांचीही मनं जिंकून घेतली आहेत. रोहित शर्मा म्हणाला की, ‘मला एकतर्फी विजयापेक्षा असे अटीतटीच्या सामन्यात मिळालेले विजय आवडतात.’ या एका वाक्यात त्याने खेळभावना दाखवली. त्याचबरोबर दोन्ही देशांच्या चाहत्यांची मने जिंकली. जगभरातील जे चाहते खेळभावनेने हा सामना पाहत होते, त्या सर्वांची मने रोहितने यावेळी जिंकली आहेत. सलामीच्याच सामन्यात भारताने पाकिस्तानचा करेकट कार्यक्रम केला असला तरी अन्य देशांशी सामने बाकी आहेत. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असल्याने कोणाचा खेळ कधी उंचावेक आणि कोण मुसंडी मारेल, हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. सलामीच्याच सामन्यात पाकला पराभूत केल्याने भारतीय उत्साहीत झाले आहेत. अन्य देशांच्या तुलनेत भारताचा संघ तुल्यबळ असल्याने अशिया चषकावर नाव कोरणे भारताला अवघड नाही.