Monday, April 21, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखगोलंदाजीतील व्हेरिएशन भारताच्या पथ्यावर!

गोलंदाजीतील व्हेरिएशन भारताच्या पथ्यावर!

रोहित गुरव

एखाद्या मोठ्या स्पर्धेतील पराभवाचे उट्टे काढल्याशिवाय तगड्या संघांना आणि त्यांच्या चाहत्यांना समाधान मिळत नाही. पाक विरुद्धच्या गेल्या विश्वचषक स्पर्धेतील पराभवाची सल तमाम भारतीयांच्या मनात होती. त्यामुळेच रविवारी झालेला आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान हा सामना विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यापेक्षा कमी नव्हता. या सामन्याला जगभरातील चाहत्यांनी डोक्यावर घेतले होते. त्यामुळे करोडो डोळे या सामन्यावर लागलेले होते. अपेक्षेप्रमाणे सामन्यानेही त्याचे महत्त्व सिद्ध केले आणि जगातील क्रीडा चाहत्यांना एक रोमहर्षक खेळ ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवायला मिळाला.

पराभवातून धडा घेणे आणि आपल्या कामगिरीत सुधारणा करणे ही मोठ्या संघांची सवय असते. त्याचा प्रत्यय रविवारच्या हायव्होल्टेज सामन्यात आला. दहा महिन्यांपूर्वीच्या पराभवाचा हिसाब चुकता करण्याची संधी यानिमित्त भारतीय संघाकडे होती. दुखापतग्रस्त शाहीन आफ्रिदी वगळता पाकिस्तानचा जवळपास पूर्ण संघच भारतासमोर दोन हात करण्यासाठी मैदानात उतरला होता. दुखापतींचा फटका भारतालाही बसला नव्हता असे नाही. गोलंदाजीची धार जसप्रित बुमराहला दुखापतीमुळे स्पर्धेला मुकावे लागले आहे. त्यामुळे दुखापतीचा फटका दोन्ही संघांना समान पातळीवर बसला आहे.

या हायव्होल्टेज सामन्याकडे समीक्षेच्या परिप्रेक्ष्यातून पाहिले, तर भारत दोन्ही आघाड्यांवर सरस ठरला आहे. त्यामुळेच विजयाची माळही त्यांच्याच गळ्यात गेली. विशेष आणि प्रथम लक्ष जाते ते गोलंदाजीतील भारताच्या दमदार कामगिरीकडे. भुवनेश्वर कुमारने अचूक टप्प्याला स्विंगची अप्रतिम साथ देत व्हेरिएशनचा खेळ खेळत बाबर आझम-मोहम्मद रिझवान या जोडीला गपगार केले. पहिल्याच षटकात रिझवानला पायचित केले होते; पण डीआरएस त्यांच्या मदतीला धावून आले आणि रिझवानला जीवदान मिळाले. पण भुवनेश्वरने आपली लय काही सोडली नाही. तो दोन-तीन चेंडू स्टम्प टू स्टम्प गुड लेन्थवर फेकून स्विंगशी खेळत होता. मध्येच व्हेरिएशन करत एखादा चेंडू बाऊंसर फेकत फलंदाजाला सतवत होता. त्यातच बाबर आझमचा संयम सुटला आणि त्याने अर्शदीप सिंगकडे सोप झेल देत गाशा गुंडाळला. त्यामुळे पाकिस्तान सुरुवातीपासून बॅकफुटला गेला होता. हार्दिक पंड्यानेही भुवनेश्वरची जागा घेत त्याची लय अचूक पकडली. गुड लेन्थ, स्टम्प टू स्टम्प गोलंदाजी आणि मध्येच उसळता बाऊंसर हे भारतीय गोलंदाजीचे सूत्र पंड्यानेही कायम ठेवले. त्यामुळे हे दोन्ही गोलंदाज धावा रोखण्यासह बळी मिळवण्यात यशस्वी ठरले. कर्णधार रोहित शर्मानेही त्यांचा अचूक वापर करून घेतला. भुवनेश्वरला थांबवत त्याने आवेश खानकडून गोलंदाजी करून घेतली. पंड्याच्याही हाती लवकर चेंडू सोपवत दबावतंत्र कायम ठेवले. आवेश खानची गोलंदाजी महागडी पडत असल्याचे जाणवल्यानंतर त्याची षटके रवींद्र जडेजाकडून टाकून घेतली. त्यामुळे रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्या हे अष्टपैलू खेळाडू महत्त्वाचे ठरले.

फलंदाजीत भारताला सुरुवात खराब मिळाली असली तरी रोहित-विराट यांची भागीदारी त्यानंतर हार्दिक पंड्या-रवींद्र जडेजा यांची मॅचविनिंग खेळी भारताच्या विजयात निर्णायक ठरली. जडेजाने सुरुवातीला संयम दाखवला, पण नंतर कमजोर चेंडू ओळखून हल्ला चढवत दबाव झुगारून दिला. दुसरीकडे, पंड्याचे शॉट सिलेक्शन अचूक ठरले. त्याने कमजोर चेंडू ओळखून हल्ला चढवला. त्यात तो यशस्वीही ठरला. तीन चौकार आणि एक षटकार पंड्याने डीप फॉरवर्डच्या दिशेनेच लगावले. १९व्या षटकात त्याने लगावलेल्या तीन चौकारांमुळे सामन्याचे पारडे फिरले. त्याआधी फिरकीपटूला एक अप्रतिम षटकार लगावला होता. जडेजाचा वेळीच संयम आणि पंड्याची योग्य वेळी फलंदाजी भारताला फळली.

अचूक फटक्यांची निवड हे पाकिस्तानच्या फलंदाजांच्या अपयशाचे मुख्य कारण ठरले. बाबर आझम, इफ्तिकार अहमद हे भारताच्या सापळ्यात अलगत अडकले. रिझवानही पहिल्याच षटकात बाद होता होता थोडक्यात बचावला होता. नाही तर पाकिस्तानची अवस्था आणखीच वाईट झाली असती. तळात शाहनवाज दहानीने दोन षटकार लगावत पाकला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. फलंदाजांनी केलेली चूक पाकिस्तानच्या गोलंदाजांना सुधारता आली नाही. नसीम शाहच्या वेगापुढे भारताचे फलंदाज सुरुवातीला चाचपडले होते. पण येथे शक्कल लढवत भारताने संयमी फलंदाजी केली. लक्ष्य मोठे नसल्याने ते भारताला जमले. शाहीन आफ्रिदीची कमतरता पाकिस्तानला भासली. दुसरीकडे, दबाव पाकिस्तानच्या खेळाडूंवर स्पष्ट जाणवत होता. यष्टिरक्षक मोहम्मद रिझवानने दोनदा हातातील सोपा चेंडू सोडून भारताला धावांचे गिफ्ट दिले.

आयपीएलसह मर्यादित षटकांच्या वाढत्या सामन्यांना भारतीय खेळाडू सरावले आहेत. त्यात रविवारी एकापेक्षा एक असे तगडे खेळाडू भारताच्या ताफ्यात होते. मोठ्या विजयाने भारत गेल्या पराभवाची परतफेड करणार अशी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. कारण भारत-पाक सामन्यातील दबाव वेगळाच असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसले. त्यामुळे भारताने जरी विजय मिळवला असला, तरी तमाम भारतीय चाहत्यांना अपेक्षित असा हा विजय नव्हताच.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -