नाशिक (प्रतिनिधी) : नागरिकांनी गणेशोत्सव साजरा करतांना नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन करून गणरायाच्या उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी खबरदारी घेत आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे सांगून संबंधित विभागांनी रस्ते दुरूस्तीची कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात विविध विभागांच्या आढावा बैठकीत डॉ. पवार बोलत होत्या. या बैठकीस जिल्हाधिकारी गंगाथरन डी, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रशेखर पुलकुंडवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसीकर, सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना, वर्षा मीना, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे, पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिकचे विभाग नियंत्रक अरूण सिया यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
डॉ. पवार पुढे म्हणाल्या की, पावसाळ्यात रस्त्यांची झालेली दूरवस्था त्यात निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास होणार नाही, यासाठी संबंधित विभागांनी उपलब्ध असलेल्या निधीमधून तत्काळ रस्ते दुरूस्तीची कामे मार्गी लावावीत. तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांची कामे दर्जेदार असावीत. यासोबतच ग्रामीण भागातील नागरिकांना आवश्यक मुलभूत सुविधा पुरवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.
जल जीवन मिशन अंतर्गत करण्यात येणारी कामे चांगल्या दर्जाची होण्यासोबतच वेळेत पूर्ण करण्यात यावीत. सोळा गाव पाणी पुरवठा योजनेतील कामे करतांना ग्रामस्थांना विश्वासात घेवून कामे करण्यावर भर द्यावा, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेत जमीनींचे पंचनामे करतांना कोणीही बाधित शेतकरी वंचित राहणार नाही, याकडे लक्ष द्यावे, अतिवृष्टीने खराब झालेल्या रस्त्यांमुळे काही ठिकाणी एस.टी. बसेस जाणे शक्य होत नाही. तेथे महामंडळाने सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या सहकार्याने एस.टी. सेवा पुरविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी केल्या. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अमृत सरोवर योजनेंतर्गत जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या ७५ अमृत सरोवरांपैकी ४७ सरोवरांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच या सरोवरांपैकी ४ ठिकाणी स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीत संबंधित विभाग प्रमुखांनी त्यांनी केलेल्या कामाची माहिती सादर केली.