वाडा (वार्ताहर) : वाडा शहरातील मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकाना समोरून एका महिलेची पर्स अज्ञात व्यक्तीने लंपास केल्याची घटना घडली आहे.
सोमवार दिनांक २९ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास गौरी जोगारी ही महिला पातकर यांच्या दुकाना समोर रस्त्याच्या कडेला बांगड्या व तत्सम वस्तू विकायला बसलेल्या महिलेच्या दुकाना समोर आपल्या हातातील पर्स व पिशवी खाली ठेऊन बाळाला कडेला घेऊन थांबली होती. काही क्षण तिचे पिशवी व पर्सकडे लक्ष दुसरीकडे होताच कोणीतरी अज्ञात इसमाने तिची पर्स लांबवली.
काही वेळाने हा प्रकार महिलेच्या निदर्शनास आला. मात्र पर्स चोरणारी व्यक्ती कोण होती व कुठे गेली ते कळले नाही. या पर्स मध्ये रोख दीड हजार रुपये, दुरुस्ती साठी आणलेले कानातील सोन्याची फुले, चांदीची पैंजण व जोडवे असा ऐवज होता. याबाबत सदर महिलेने वाडा पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला असून वाडा पोलीस तपास करत आहेत.
दोन दिवसात गणेशोत्सव असल्याने बाजारात गर्दी वाढली आहे, काही समाज कंटक या गर्दीचा फायदा घेऊन असे चोरीचे कृत्य करत असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे.