मुंबई (प्रतिनिधी) : एखाद्या व्यक्तीने झेंडा हातात घेतला नाही म्हणजे त्या व्यक्तीचे देशावर प्रेम नाही असा त्याचा अर्थ होत नाही अशी प्रतिक्रिया भाजप आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केली आहे. रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान बीसीसीआयचे सचिव आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सुपुत्र जय शाह यांनी भारताचा तिरंगा हाती घेण्यास नकार दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यावर नितेश राणे ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
नितेश राणे यांनी म्हटले की, भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तींना देशभक्ती शिकवण्याची काहीही गरज नाही. एखाद्याने देशाचा झेंडा हाती घेतला नाही म्हणजे त्या व्यक्तीचे देशावर प्रेम नाही, असे कुठं लिहीलं नाही. कोणाचे किती देशप्रेम आहे याबद्दल आम्हाला कोणाच्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचे नितेश राणे यांनी म्हटले.
पायाजवळ काय जळतेय ते पाहावे?
रोहित पवारांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत आहेत. ईडीकडून नोटीस पाठवली जात आहे. ईडी म्हणजे नर्सरी नाही. त्यांच्याकडे माहिती आल्यानंतर नोटीसी दिल्या जातात, असेही राणे यांनी म्हटले. आमचे मोहित कंबोज, किरीट सोमय्या यांचा स्ट्राइक रेट चांगला आहे. हे लोक आरोप करताना कागदपत्रांच्या आधारे आरोप करतात. कागदपत्रात काही चूक नसेल तर कारवाई होणार नाही. मात्र, रोहीत पवार यांनी आता बायडन, रशिया यावर बोलण्यापेक्षा आपल्या पायाजवळ काय जळतंय याकडे लक्ष द्यावे असा टोलाही त्यांनी लगावला.
राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांना ऑफर करावी का?
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी येण्याचे आमंत्रण दिले होते. पंकजा यांनी राष्ट्रवादीत यावे असे अमोल मिटकरी यांनी म्हटले. अमोल मिटकरींनी दुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा स्वत: च्या पक्षाकडे लक्ष द्यावे असा टोला नितेश राणे यांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विरोधी पक्षनेते पदावरून काय सुरू आहे ते त्यांनी पाहावे.
अमोल मिटकरींसारखेच आम्ही जयंत पाटील यांना ऑफर करावी का, असे नितेश राणे यांनी म्हटले. तर, शिवसेना-भाजप युतीचे सरकार ताकदीने सुरू आहे. २०२४ पर्यंत हे सरकार कायम राहणार. तुमच्यासोबत उरलेले आमदार सोबत राहतील का, याची काळजी खैरेंनी घ्यावी असे म्हणत राणे यांनी चंद्रकांत खैरेंना प्रत्युत्तर दिले.