Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रनाशिकमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरला बेदम मारहाण

नाशिकमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरला बेदम मारहाण

साहित्याचीही तोडफोड, मारहाण करणाऱ्यांची धरपकड

मनमाड : रिपोर्ट न दिल्याच्या कारणावरून रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरला बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री साडेदहा वाजता घडली. छत्रपती शिवाजी चौकात असलेल्या गांधी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर जितेंद्र गांधी यांना मारहाण करून हॉस्पिटलमध्ये साहित्यांची तोडफोड करण्यात आल्याच्या घटनेचे मनमाडमध्ये तीव्र पडसाद उमटले.

शहरातील सर्व डॉक्टरांनी पोलिस स्थानकात जाऊन घटनेचा निषेध केला. मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून मारहाण करणाऱ्यांची धरपकड सत्र सुरू केली आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या गांधी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर जितेंद्र गांधी हे संध्याकाळच्या सुमारास दवाखान्यात नेहमीप्रमाणे रुग्णांना तपासत होते. यावेळी काही पाच ते सहा तरुण हॉस्पिटलमध्ये घुसले. त्यांनी डॉक्टरांकडे उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या आपले नातेवाईक अनुष्का गरुड या मुलीचे रिपोर्ट आम्हाला द्या असे बोलले.

मात्र डीस्चार्ज केल्याशिवाय रिपोर्ट मिळणार नाही, तर डीस्चार्ज झाल्यावरच आम्ही तुम्हाला रिपोर्ट देऊ असे सांगितले असता, डॉक्टर आणि या तरुणांमध्ये बाचाबाची झाली मात्र या बाचाबाचीचे पुढे वादावादीत रूपांतर झाले. त्यानंतर या तरुणांनी काही समजण्याच्या आतच त्यांच्यावर लाथ बुक्यांनी मारहाण केली. अचानक डॉक्टरांना मारहाण सुरू झाल्याने रुग्णालयात उपचार घेत असलेले इतर रुग्ण गोंधळून गेले, आरडाओरडा सुरू झाला. या हल्ल्यात डॉ. जितेंद्र सुरेश गांधी (वय ३३) यांना मुका मार लागला आहे. या हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांनी सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे संशयित आरोपींचा शोध सुरू केला आहे.

सध्या या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली असून आता पोलिसांनी रुग्णालयात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून आरोपीची ओळख पटवून त्याला ताब्यात घेतले आहे, तर काही जणांचा शोध सुरू आहे. अनुष्का गरुड या तरुणीला उपचारासाठी चार दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, डॉक्टरावर झालेल्या या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील डॉक्टरांच्या संघटनेने या हल्ल्याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून डॉक्टर संघटनेने आज पोलीस स्थानकात जाऊन डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला, तर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करत इंडियन मेडिकल असोसिएशने पोलिसांना निवेदन देत आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यावेळी जेष्ठ हृदयरोगतज्ञ डॉ. संदीप कुलकर्णी, डॉ. सुनील बागरेचा, बालरोगतज्ञ डॉ. रवींद्र राजपूत, डॉ. प्रताप गुजराथी, डॉ. अजय भन्साळी, डॉ. प्रताप पाटील, डॉ. शांताराम कातकडे, डॉ. नूतन पहाडे, डॉ. संजय सांगळे, डॉ. सतिष चोरडिया, डॉ. हर्षल पारख, डॉ. वर्षा झल्ट, डॉ. सुहास जाधव, डॉ. विकास चोरडिया, डॉ. अमोल गुजराथी, डॉ. मच्छिद्र हाके, डॉ. धीरज बरडीया, डॉ. अविनाश डघळे, डॉ. शशिकांत कातकडे, डॉ. योगेश देवरे, डॉ. सचिन देवळे, डॉ. समीर ढोकळे, डॉ. मोहित लोढा, डॉ. सुशांत तुसे, डॉ. संदीप दराडे, संतोष लुनावत आदी उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -