नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशिया चषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताने हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानला धूळ चारली. या विजयानंतर भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
भारतीय संघाच्या विजयाबद्दल पंतप्रधान मोदींनी टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट केले की, ‘आज आशिया कप २०२२च्या सामन्यात टीम इंडियाने शानदार कामगिरी केली. संघाने उत्तम कौशल्य आणि संयम दाखवला. विजयाबद्दल अभिनंदन.’
दहा महिन्यांपूर्वी २४ ऑक्टोबर २०२१ रोजी भारतीय संघ विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच पाकिस्तानकडून पराभूत झाला होता. रविवारी रात्री टीम इंडियाने या पराभवाचा हिशेब चुकता केला. त्यानंतर भारतीय संघाच्या या कामगिरीचे जगभरातून कौतुक होत आहे. जगभरातील मोठमोठ्या खेळाडूंनी भारतीय संघातील खेळाडूंची पाठ थोपटली आहे.