विक्रमगड (वार्ताहर) : तालुक्यात गेल्या दोन महिन्यापासुन वरुणराजाची बरसात असल्याने व निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. जास्त पाउस पडला तरी नुकसान व कमी पाउस पडला तरी नुकसान त्यातच भात पिकांना कणसे भरणीचा मोसम आला असतांना तालुक्यात भातपिकांवर विविध भागात मोठया प्रमाणावर बगळया रोगाची लागण झाल्याने शेतकरी चिंतीत झाले आहे.
या रोगामुळे भात रोपावरील पातीतील कणसेत पळींज तयार होत आहे. त्यामुळे या रोगावर वेळीच उपाय योजना करणे गरजेचे असते मात्र काहींना किटकनाशके औषध फवारणी करुनही हा रोग आटोक्यात आणता आला नाही. त्यामुळे हया ना त्या त-हेने शेतक-यांचे नुकसान मात्र अटल आहे. याचा परिणाम भात उत्पादनावर होत असुन उत्पादनात घट निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
याबाबत विक्रमगड येथील शेतकरी अरुण वामन पाटील यांचे शेतावर जाउन प्रत्यक्ष पाहाणी केली असता त्यांचे जमीनीतील भात क्षेत्रावर मोठया प्रमाणावर लागवड केलेल्या भातरोपांना बगळया रोगाने पछाडले असुन त्यांनी याबाबत माहिती देतांना चिंता व्यक्त केली आहे. अनेक भागात या रोगाची लागन मोठया प्रमाणावर झाल्याचे शेतक-यांकडुन सांगण्यात येत आहे.
या रोगामुळे तालुक्यातील पिंकांवर बगळया रोगाचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचा अंदाज शेतक-यांकडुन वर्तविण्यात येत असुन जवळ जवळ भातपिके घटण्याचा अंदाज ओंदे येथील शेतकरी बबन पाटील यांनी सांगितले या समस्येकडे कृषी विभागाने गांभीर्याने लक्ष देवुन प्रतिबंधनात्मक औषध फवारणी व औषध उपलब्ध करुन देउन भात पिकाची पाहाणी करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडुन होत आहे.