Sunday, March 16, 2025
Homeमहाराष्ट्रपालघरबोईसरमधील रेशन धान्याचा काळाबाजार; चार जणांना अटक

बोईसरमधील रेशन धान्याचा काळाबाजार; चार जणांना अटक

बोईसर (वार्ताहर) : बोईसर मधील रेशन धान्याच्या काळाबाजार प्रकरणातील अटक चार आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून यातील एक फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. शुक्रवारी पहाटे बोईसर वंजारवाडा येथील रास्त भाव धान्य दुकानातील १० टन तांदूळ चोरीछुपे लंपास करून टेंपोमधून काळाबाजारात विक्री करण्यासाठी नेताना बोईसर पोलिसांनी पकडले होते.

जप्त टेंपोमधील धान्याचा पंचनामा करून याप्रकरणी जीवनावश्यक वस्तू अधींनियमांतर्गत पाच आरोपींवर बोईसर पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. या पाच आरोपींमधील फुलबनो सिंग, प्रदीप लोहार, विजय बारी, मनोहर वडे या चार जणांना अटक करण्यात येऊन पालघर न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तर धान्याच्या काळाबाजार प्रकरणातील प्रमुख आरोपी वाडा येथील राईस मीलचा मालक संदीप पाटील हा आरोपी गुन्हा दाखल होताच फरार झाला आहे. पालघर जिल्ह्यात ऐन सणासुदीच्या दिवसांत गरीबांच्या वाट्याच्या रेशन धान्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असून रेशन दुकानांतील तांदूळ वाडा आणि इतर भागातील भात गिरण्यांमध्ये नेऊन तेथे त्याच्यावर पॉलिश करून खुल्या बाजारातील दुकानदारांना वाढीव दरात विक्री करण्याचे मोठे रॅकेट सक्रीय आहे.

या रॅकेट मध्ये पुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचारी, रास्त भाव धान्य दुकान चालक व मालक यांच्यासह जिल्ह्यातील राईस मील मालक हे सामील असण्याची शक्यता असून त्यादृष्टीने बोईसर पोलिसांनी हे प्रकरण अतिशय गांभिर्याने घेतले असून पालघर पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, बोईसर उपविभागीय पोलिस अधिकारी नित्यानंद झा, पोलिस निरीक्षक सुरेश कदम, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजय डाखोरे हे या काळाबाजार प्रकरणाच्या अगदी मुळाशी जाऊन तपास करीत आहेत त्यामुळे धान्य माफीयांची झोप उडाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -