Tuesday, April 29, 2025

रायगड

सुधागडमध्ये शेकडो कोंबड्यांचा अचानक मृत्यू

सुधागड -पाली (वार्ताहर) : सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर गावात अचानक शेकडो कोंबड्या मृत्युमुखी पडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ही बाब पशुवैद्यकीय विभागाच्या लक्षात आल्यानंतर ताबडतोब शुक्रवार रात्रीपासूनच येथील कोंबड्यांना लसीकरणास सुरुवात झाली आहे. मात्र त्यानंतरही कोंबड्या दगावण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे पशुपालक चिंताग्रस्त झाले आहेत.

याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ता मंगेश यादव यांनी सांगितले की, काही दिवसांपासून शेतकरी व ग्रामस्थांच्या गावठी कोंबड्यांना मरगळ (झुरून) येऊन त्या अचानक मृत होऊ लागल्या आहेत. आत्तापर्यंत ४०० ते ५०० कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामस्थ व पशुपालकांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत कोकरे यांनी एका रात्रीत २०० कोंबड्यांना आरडी या औषधाचे डोस दिले. यावेळी पोलीस पाटील सुनील पोंगडे, ग्रामस्थ मारुती यादव, नितीन यादव व मंगेश यादव यांच्यासह ग्रामस्थांनी सहकार्य केले. मात्र दुसऱ्या दिवशी डोस दिलेल्या बहुसंख्य कोंबड्या दगावल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अचानक कोंबड्या दगावल्याने पशुपालक हैराण झाले आहेत.

जवळील वावळोली गावातील इतर कोंबड्यांना लागलीच आरडी डोस देण्यात आला आहे. इतरही गावांत लसीकरण करण्यात येणार आहे. कोंबड्यांचा मृत्यू नक्की कशाने झाला आहे, हे सांगता येणार नाही. शवविच्छेदन केल्यावरच मृत्यूचे कारण कळू शकेल. आजारी कोंबड्या असलेल्या पशुपालकांनी ताबडतोब पशुधन विकास विभागाकडे संपर्क साधावा. तातडीने येथील कोंबड्यांचे लसीकरण करण्यात येईल. -डॉ. प्रशांत कोकरे, पशुधन विकास अधिकारी, सुधागड

Comments
Add Comment