Friday, July 19, 2024
Homeमनोरंजनथोडे मागे सरकूया का?

थोडे मागे सरकूया का?

डॉ. विजया वाड

अवधूत दिगंबर कामत तसं मोठंच नाव होतं त्या उपनगरात. अगदी सातत्यानं तीस वर्षं गाजत वाजत असलेलं नाव. पण सून घरात आली आणि शांत असलेलं घर वाजू लागलं.
त्या घराला फक्त अवधूत साहेबांचाच आवाज ऐकायची सवय होती. पण इतरांसारखी खालमानेनं ऐकून
घेण्याची सवय सुनेला नव्हती ना! सलामी आल्या आल्या दुसऱ्या दिवशीच झडली.
त्याचं असं झालं…
‘हे काय… पेपर कुठाय?’ उठल्याबरोबर अस्वस्थपणे अवधूतसाहेब गरजले.
‘हळू ओरडा हो…’आऊताईनी यजमानांना असं म्हटलं मात्र…ते एकदम उसळून ओरडले…
‘ओरडणं कधी हळू असतं? मूर्ख कुठली!’ आऊताई एकदम सकाळीच कुणी चपराक गालावर मारल्यासारख्या गप्पठप्प झाल्या.
‘पेपर कुठाय?’अवधूतसाहेब पुन्हा गरजले. सकाळी ठीक पावणेसातला चहाचा वाफाळता कप आणि पेपर त्यांच्या बैठकीवर हजर असे. गेल्या तीस वर्षांचा हा नियम अचानक मोडला? कसा मोडला? कुणी मोडला?’
‘कुणाची एवढी हिंमत?’ ते पुन्हा कडाडले. त्यांच्या नवपरिणित सूनबाई टॉयलेटमधून बाहेर आल्या.
‘काय झालं एवढं ओरडायला?’ तिनं अगदी सहजस्वरात विचारलं.
‘आं?’ अवधूत साहेबांनी ओठांचा चंबू करून अपूर्वाकडे बघितलं. डोळे बारीक केले… वटारले… तरी ती अगदी स्वस्थचित्त होती आणि मुख्य म्हणजे जराही घाबरली नव्हती.
‘पेपरसाठी आहे वाटतं सगळा ठणाणा? घ्या!’ तिनं काखोटीला घडी करून धरलेला पेपर त्यांच्या हाती ठेवला.
‘तू काय टॉयलेटमध्ये पेपर नेला होतास?’
‘हो.’
‘काय?’ त्यांना सुनेच्या धारिष्ट्याचं आश्चर्य वाटत होतं.
‘खरंच सांगते. गेली कित्येक वर्षांची सवय आहे माझी ती. लग्न झाल्या-झाल्या एकदम कशी बदलेल? आता वाचा की. चांगला स्वच्छ आहे.’
तिच्या अधिकपणानं अवधूतसाहेब संतप्त झाले. त्यांच्या हातात चार घड्या करून ठेवलेला पेपर त्यांनी झुरळ झटकावं तसा फेकून दिला.
‘शीशीशीशीशीऽऽहा पेपर मला मुळीच वाचवणार नाही.’ ते तरातरा उठले आणि बेसिनपाशी उभे राहून त्यांनी जिभेवर बोटं फिरवीत कोरड्या ओकाऱ्या काढल्या.
अपूर्वा आत गेली. ‘विचित्रच आहेत.’ ती आऊंना म्हणाली, पण आऊंनी तिच्या तोंडावर हात ठेवला नि त्या पुटपुटल्या….
‘शूज हळू बोल बाई. त्यांच्या विरुद्ध कुणी ब्र नाही काढू शकत या घरात.’
तिनं सासूचा हात तोंडावरून हलकेच बाजूला केला आणि ती म्हणाली,
‘मी काढणार ब्र…! क…त्र…त…सग्गळे भाव व्यक्त करणार. मी अतिशय मोकळी ढाकळी वाढले आहे आणि या घरातही तशीच वावरणार आहे.’
त्याच्या दुसऱ्या दिवसापासून घरात सूनबाईंनी चार वृत्तपत्रे लावली. घरात चार माणसं आहेत ना! चौघांना चार वेगवेगळी वृत्तपत्रं. वाचा किती वाचता ते.
अवधूत साहेबांच्या हा घोट पचनी पडणे अवघड होते.
‘या चार चार वृत्तपत्रांचे पैशे कोण भरणार? तुझा बाप?’
‘ते कशाला भरतील? त्यांचा संबंधच काय? ह्या सर्वच्या सर्व वृत्तपत्रांचे बील अर्थातच मी भरेन. माझे नृत्याचे वर्ग अतिशय उत्तम चालतात. मी सहज दहा-बारा हजार मिळवते चार तास काम करून, इट इज नॉट अ बीग डील.’
अरे वा!
म्हणजे महिन्याकाठी मिळणारे दहा-बारा हजार ही स्वत:च्या मन मर्जीप्रमाणे खर्च करणार? आपल्या हाती न देता? त्यांनी प्रथम डोळे बारीक करून नंतर वटारून तिच्याकडे बघितलं. मग क्षणात त्यांच्या लक्षात आलं की, हा बार फुसका होता. ते गरजले, ‘अशी या घराची पद्धत नाही. तुझा घो सगळाच्या सगळा पगार इमाने इतबारे माझ्या हाती महिन्याच्या महिन्याला देतो नि मी सगळा घरखर्च चालवतो. काय समजलीस?’
‘छानच की! चालवा तुम्ही घर. मीही त्यात दोन हजारांची भर टाकीन बरं का. माझ्या खावटीला याहून अधिक पैसे बिलकुलच लागणार नाहीत.’ तिनं स्वच्छ स्वरात सांगितलं.
ही म्हैस रेडा होऊन आपल्या अंगावर चालून येतेय असं वाटलं त्यांना.
‘लग्नाला सात वर्षं होईपर्यंत सुनेला किती जपतात लोक, तिनं एवढास्सा जरी आवाज काढला तरी पोलीस चौकीत त्या आवाजाचा कर्णा होतो कर्णा! सासरच्या माणसांनी सुनेला दाबून दडपून ठेवायचे दिवस गेले आता. इतिहास जमा झाले.’
एखादी जखम व्हावी आणि त्यावर कुणीतरी चरचरा मीठ चोळावं तसं अवधूत साहेबांना झालं.
ही नृत्याचे वर्ग चालवते की कायद्याचे?
हिचा बाप पोलिसात नसून पोलीस चौकीची हिला एवढी माहिती?
आऊ गरीब! त्यांना पहिल्यांदाच आपल्या बायकोबद्दल अनेकानेक वर्षांनी गहिवर दहिवर आला. पण खरं तर आऊ अतिशय आनंदल्या होत्या. आपल्या सोटाछाप नवऱ्याला बरी, भेटली तोडीस तोड! त्यांच्या दहादा मनात आलं.
सुनेला अगदी पाठीवर थाप मारून शाबासकी द्यावी यासाठी त्यांचे हात शिवशिवत होते. पण जन्मभर मारून मुटकून नवऱ्याची दादागिरी सहन केल्याने तसा उघड उघड धीर होत नव्हता.
छोट्या-छोट्या गोष्टीत सून आवाज करते म्हणजे काय?
या घराला मांसाहाराची सवय नव्हती. पण हिनं रविवारी सरळ चिकनचे लेग पीस आणले.
‘शीशीशीशीशी ऽऽ…’ ते गरजले.
‘चिकनचा माशासारखा वास येत नाही की काही नाही. शिवाय अनंताला चिकन अतोनात आवडतं. आमच्या घरी येऊन तो कितीदा तरी चिकन हादडायचा. खरं तर मला उत्तम चिकन बनवता येतं म्हणून तर तो माझ्या प्रेमात पडला.’ ती म्हणाली.
‘प्रेमात?’ अवधूत साहेबांना हे अनाकलनीय होते. ‘हो प्रेमात.’ ती ठासून म्हणाली. अनंता बिचारा गप्प होता.
‘अरे अनंता, आपलं आता लग्न झालं. आपली आयुष्य हिंदू कायद्याप्रमाणे जन्मभरासाठी आणि हिंदू धर्माप्रमाणे सात जन्मांसाठी एकत्र बांधली गेली. आता कळीकाळही त्यात बदल करू शकणार नाही. मग कशाला आडपडदा? बाबा, अहो माझा नवरा गरीब स्वभावाचा पडला. त्याला भीती वाटत होती प्रेम व्यक्त करण्याची! शेवटी मग माझे आई-वडील आपल्याकडे माझं स्थळ घेऊन आले. नशिबाने तुम्ही मला पसंत केलीत.’ ती साळसूदपणे म्हणाली.
‘आणि नसती पसंत केली तर?’
‘तर आम्ही तुमच्या मनाविरुद्ध लग्न केलं असतं. वेगळ्या लीव्ह लायसन्सच्या जागेत राहिलो असतो.’ ती ठासून म्हणाली.
‘फार शहाणी आहेस.’ ते उपहासाने म्हणाले.
‘खरं तर तुम्हाला दीड शहाणी म्हणायचं आहे ना बाबा? पण छोट्या छोट्या गोष्टीत कशाला हवा वाद? एकत्र राहायचं तर डोकी आपटत कशाला? आपण जरा समजुतीनं घ्याल का?’
तिचं बोलणं आऊंना पटलं. चिकन तर त्यांनाही खावंसं वाटायचं. पण अवधूत कामतांचा धाक…!
आता मात्र त्यांना वाटलं… बस झालं भिणं… बोलायचं आपणही. ज्येष्ठ नागरिक झालो तरी शेपूची भाजी?… ‘ऐका हो! आता त्यांचं राज्यय, करूद्या चिकन. वागू द्या मनाजोगं. आपण थोडं मागं सरकूया का? सरकूयाच!’ अवधूत साहेबांचं तोंड एकदम भोकाचं थालीपीठ झालं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -