नालासोपारा (वार्ताहर) : जमिनीत गाडलेले पुरातन सोने मिळाले असून ते कमी किमतीत विकायचे आहे, असे भासवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा वसईत पर्दाफाश झाला आहे. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे कक्ष तीनच्या पथकाने ही कामगिरी केली असून, उत्तर प्रदेशामधून चार आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून बनावट सोन्याची पाने, मनी, माळ असा मुद्देमाल जप्त केला आहे.
विशाल धर्मा राय (१९), संजू वालिया राय (२७), शिवराम हिरालाल माली (५७), मीना रामलाल सोलंकी (४५) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून हे सर्वजण उत्तर प्रदेशच्या खेडा फिरोजाबादचे रहिवाशी आहेत. मागच्या काही महिन्यांपासून मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय हद्दीत नागरिकांची आर्थिक फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाली होती. जमिनीत गाडलेले सोन्याचे पुरातन सोने मिळाले आहे आणि ते कमी किमतीत विकायचे आहे, असे भासवून फसवणुकीचे प्रमाण वाढले होते. या गुन्ह्याच्या अनुषंगाने मुख्यालय पोलीस उपायुक्त विजयकांत सागर, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे कक्ष शाखा तीनचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी खाडे, उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, शंकर शिंदे, सचिन घेरे, सागर बावरकर, पोलीस नायक मनोज सकपाळ, पोलीस अंमलदार राकेश पवार, अश्विन पाटील, सुमित जाधव यांचे स्वतंत्र पथक तयार करण्यात आले होते.
या पथकाने तपास सुरू केला असता या टोळीने २५ जुलै रोजी सायंकाळी वसई पश्चिम भाजीमार्केट जवळील पंचवटी हॉटेलजवळ एका अनोळखी व्यक्तीने सुनील प्रवीणचंद्र चोक्सी यांचा विश्वास संपादन करून, पितळी धातूची पाने सोन्याची असल्याचे भासवून त्यांची १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले. याबाबत वालीव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.
गुन्हा करण्याची आरोपींची पद्धत, त्यांचे ठिकाण, पोशाख यावरून गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणातून हे आरोपी फसवणूक केल्यानंतर उत्तर प्रदेशला फरारी होत असल्याचे समोर आले. सर्व आरोपींचे मोबाईल लोकेशन घेऊन प्रमोद बडाख यांच्या पथकाने उत्तर प्रदेश येथे सापळा रचून या चारही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५ किलो वजनाची बनावट सोन्याची पाने, मनी आणि माळ असा ऐवज जप्त केला आहे.