Sunday, March 23, 2025
Homeसाप्ताहिककोलाजलाल माती आणि गणपती!

लाल माती आणि गणपती!

अनुराधा परब

कोकणातील गणेशोत्सव म्हणजे दिवाळीपूर्वीची दिवाळी. लाल मातीतल्या संस्कृतीचा विशेष सण. जुन्या घरांना कात टाकायला लावणारा, दूर गेलेल्यांना सांधून घेणारा, भजनांच्या नादाने रात्र जागवणारा, गुणांना आपल्यात सामावून घेणारा, आनंदाची पेरणी करणारा, जुन्यांकडून नव्यांकडे संस्कृतीचा वारसा नकळत सोपवणारा असा सण म्हणजे गणेशोत्सव. असं काय आहे या देवतेमध्ये, ज्याच्या ओढीने कोकणवासीयांचा काफिला मिळेल त्या मार्गाने कोकणात पोहोचू पाहतो?

गणपतीविषयी आकर्षण, तर आबालवृद्ध सर्वांनाच असते तरीदेखील कोकणातला गणेशोत्सव कोणत्या अनामिक शक्तीने कोकणाबाहेर असलेल्या नोकरदार वर्गाला बोलावतो, हा कुतूहलाचा भाग आहे. कोकणी माणसाला जसं त्याच्या लाल मातीचं आकर्षण तसंच गणपतीचंही!

“गणांचा अधिपती तो गणपती” ह्या धारणेनुसार रूद्राला ‘गणपती’ म्हटलं गेलं आहे तसंच प्राचीन काळच्या गणराज्यांच्या प्रमुखालाही हे नाव दिलं गेलं होतं. असं असलं तरीही आज आपण ज्याला गजवदन म्हणून संबोधतो त्या गणपतीचे मूळ रूप गजमुखी नव्हते. ते मूळ रूप यक्ष संस्कृतीमधून आल्याचं तज्ज्ञांनी नोंदवलेलं आहे.

दक्षिण कोकणातील संस्कृती अभ्यासताना असं लक्षात येईल की, इथल्या प्राचीन देवतांचा तोंडवळा हा यक्ष, वीर संस्कृतीशी-तंत्रमार्गाशी साम्य सांगणारा आहे.

इथे आणखी एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, रूद्राला ‘व्रातपती’ असंही म्हटलं गेलं आहे. तेच नाव गणपतीला अथर्वशीर्षामध्ये मिळालेले दिसते. याच अथर्वशीर्षामधील “गणानां त्वा गणपतिं हवामहे” ही ऋग्वेदातील ऋचा येते. खरेतर हे आवाहन ऋग्वेदकालीन ब्रह्मणस्पतीला आहे; परंतु ते नंतर गणेशाला करण्यात आल्याचं दिसतं. गणपतीला अनेक नावं ही तंत्रधर्माने दिली आहेत.

गणपती हा साचेबद्ध देहापलीकडचा, “गं” या तांत्रिक शरीराचा, बीजमंत्राचा देव आहे. विघ्न आणणारा याअर्थी ‘विघ्नकर्त्या’ विनायकाची शांती करणारे मंत्र याज्ञवल्क्यसूत्रात तसेच बौधायन सूत्रात सांगितलेले असून त्या अनुसार हा एक दुष्ट ग्रह आहे. तेव्हा “त्याला विघ्न न आणता इथून दूर निघून जा,” असे मंत्रोच्चाराद्वारा सांगितले जात असे. ऋग्वेदामध्ये रुद्राला उद्देशून गणपती, गणेश, गणराज म्हटले आहे. हीच नावे पुढे गणपतीलाही मिळाल्याचे दिसते. वेदकालीन रुद्राचा शिवापर्यंतचा अर्थात रौद्र ते मंगल, शुभंकर प्रवासाप्रमाणेच संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणपतीचाही प्रवास आहे. विघ्नकर्ता ते विघ्नहर्ता हे त्याचे शुभदायक स्वरूप समाजामध्ये रुळले ते इसवी सनाच्या चौथ्या ते सहाव्या शतकाच्या उत्तरार्धादरम्यान अर्थात गुप्त काळापासून. या देवतांच्या स्वरूपामध्ये कालौघात बदल घडले असले तरीही त्यांच्यातील मूळ बीज कायम राहिलेले आढळून येते.

रूद्र, शिव आणि गणपती यांच्यामध्ये जसे नावांचे, विशेषणांचे साम्य आहे तसेच साम्य त्यांनी धारण केलेल्या आभूषणांमध्ये, वाहनांमध्येही आहे. रूद्र हा मरूत् गणांचा अधिपती तर शिव हा गणांचा अधिपती म्हटला जातो. गणपती हादेखील नंतर शिवगणांचा प्रमुख म्हणूनच सामोरा येतो. शिव गजचर्म धारण करतो, तर गणेश हा गजमुख आहे. रूद्र आणि गणपतीला तत्पुरुष, वक्रतुण्ड, दन्ती ही समान विशेषणे तर गणेश आणि शिव यांच्यातील साम्य वैशिष्ट्यांमध्ये त्रिनेत्र, भालचंद्र, नागभूषण दिसून येतात. अथर्वशीर्षामध्ये तर गणपतीला “त्वं ब्रह्मास्त्वंविष्णू त्वंरूद्रः” असे म्हटले आहे. विश्वाचे सर्वस्व केवळ गणपती असल्याचा तत्त्वतः अर्थ त्यातून निघतो. गणेशजन्माच्या कथा वेगवेगळ्या असल्या तरीही त्यातून एक सामायिक धागा मिळतो तो म्हणजे ही देवता अयोनिज आहे. ब्रह्मवैवर्त पुराण, शिवपुराण हेच सांगते. शिवपरिवारातील देवता म्हणून गणपतीला स्थान मिळाल्यानंतर शिवाची जी आभूषणे आहेत ती स्वाभाविकपणे गणपतीच्याही अंगाखांद्यावर रुळताना दिसतात. त्यात कमरेभोवतीचा नागबंध, भालचंद्र आणि त्रिनेत्र ही प्रमुख आहेत. खरेतर गणपतीचे वाहन उंदीर कसे असाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो. त्याचेही उत्तर आपल्याला तैत्तरिय संहितेमध्ये सापडते. तिथे उंदीर हे रुद्राचे वाहन म्हणून सांगितले आहे. थोडक्यात, शिव, रूद्र आणि गणपती या देवतांचे स्वरूप, आभूषणे, वैशिष्ट्ये यांवरून सद्यकाळात पूजल्या जाणाऱ्या गणेशरूपाचे सम्मिलित रूप साकारलेले दिसून येते.

गणपती हा अथर्वशीर्षामध्येच नव्हे तर पहिल्यापासूनच एकदन्त, चतुर्हस्त असा वर्णिलेला, अंकित केलेला आहे. त्याच्या वेगवेगळ्या रूपांनुसार त्याच्या ध्यानाचे, पूजेचे विधी-परंपरा बदललेल्या दिसतात. तांत्रिक देवता म्हणून उल्लेख होणाऱ्या गणपतीचे वाहन सिंह दाखविण्यात आले आहे आणि त्याचे दाखले काश्मीर, नेपाळ, अफगाणिस्तानातील गणेशमूर्तींतून मिळतात.

“…गणांचा गणपती, व्रातांचा व्रातपती, विरूपांचा विरूप अशा सर्वांचा वैदिक ब्रह्मणस्पतीमध्ये समावेश होऊन गणेशाचे आजचे विशाल रूप झाले असले पाहिजे, असे मत पु. रा. बेहेरे यांनी गणपतीच्या विघ्नकर्ता ते विघ्नहर्ता या स्वरूपाविषयी प्रतिपादित केलेले आहे. तर गणपतीची लोकप्रियता लक्षात घेता गुप्तकाळात राज्यकर्त्यांनी या देवतेला नंतर विघ्नहर्ता रूपात स्वीकारल्याचे प्रतिपादन पां. वा. काणे यांनी केले आहे.

भरतमुनींच्या नाट्यशास्त्रामध्ये रूद्राला ‘गणराज’ असे संबोधित केलेले आहे. शिवाचे तांडवनृत्य, नटराज स्वरूप आणि शिवपरिवारातील देवता म्हणून गणपतीलाही ओघाने ‘गणराज’ हे नामाभिधान मिळाल्याचे, त्याचेच प्रतिबिंब काव्यात ‘गणराज रंगी नाचतो’ यातून आपल्याला दिसून येईल; किंबहुना याच वैशिष्ट्यामुळे गणपतीला ‘चौसष्ट कलांचा अधिपती’ही म्हटले गेले आहे. प्राचीन टोळ्यांमध्ये अशा प्रकारे प्राण्यांचे मुखवटे नृत्यामध्ये वापरले जात होते, असा संदर्भ सापडतो. नंतरच्या काळातील गणपतीच्या आरतीमधील ‘शेंदूर लाल चढायो’चा संबंध असाही कदाचित जोडता येऊ शकतो. रक्तवर्ण कमळे, लाल जास्वंद गणपतीला आवडण्यामागेही प्राचीन प्रथा, कथा, विधी आहेतच.

आरंभीच्या काळात गणपती हा अवैदिकांचा देव म्हणून येताना त्याचा रक्तवर्ण अवैदिक प्रथांशी जोडलेला आहे. लालरंग तर कोकणचा आणि इथल्या मातीचाही गुणविशेष. बहुधा म्हणूनच लालमातीमध्ये फुलणारी इथली जास्वंद अंमळ जास्तच लाल असते. कदाचित माती आणि देवता असा दोहोंच्या गुणवैशिष्ट्यांचे सायुज्य कोकणी माणसाला या गणरायात दिसत असावे का, हा विचार तर्कसंगत ठरतो. आपण संस्कृतीबंधच्या पहिल्या काही भागांमध्ये या लालमातीचा इथल्या भूगर्भशास्त्राशी असलेला संबंध पाहिला होता आणि त्याचा पिकांवर होणारा परिणामही अभ्यासला होता. त्यामुळे गणपतीच्या आकर्षणासंदर्भात पडलेला हा प्रश्न वरवर साधा वाटत असला तरी त्याच्या उत्तराचा तार्किक शोध मात्र असाधारण ठरतो!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -