Wednesday, July 17, 2024
Homeसाप्ताहिककोलाजगणेशाचं आगमन आनंददायी होवो...

गणेशाचं आगमन आनंददायी होवो…

मोहन दाते

गणेश चतुर्थीच्या दिवशी पृथ्वीपासून निर्मिलेल्या मातीच्या गणपतीचं पूजन करावं. या दिवशी मातीच्या गणपतीचं विधिवत पूजन करणं, अभिषेक-मोदकाचा नैवेद्य-साग्रसंगीत नैवेद्य आणि आपल्याकडील परंपरा आणि प्रथेनुसार उपचार अगत्यानं करावेत. घरोघरी दीड, पाच, सात अथवा अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती असतात. त्या प्रत्येक दिवशी पूजा, नैवेद्य, आरती आदींद्वारे या देवतेची केली जाणारी आराधना सगळ्यांनाच आरोग्यदायी, समाधान देवो.

भाद्रपद शुद्ध चतुर्थी, बुधवार ३१ ऑगस्ट २०२२ रोजी गणेश चतुर्थीचा मंगल मुहूर्त आहे. या दिवशी आपल्याला पार्थिव गणेश पूजन करण्यास सांगितलं आहे. पार्थिव याचा अर्थ पृथ्वीपासून निर्मिलेल्या मातीच्या गणपतीचं पूजन करावं असा त्यातील साधा, सरळ, सोपा अर्थ आहे. या दिवशी मातीच्या गणपतीचं विधिवत पूजन करणं, अभिषेक-मोदकाचं नैवेद्य-साग्रसंगीत नैवेद्य आणि आपल्याकडील परंपरा आणि प्रथेनुसार उपचार करणं अगत्यानं करावं. घरोघरी दीड, पाच, सात अथवा अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती असतात. त्या प्रत्येक दिवशी पूजा, नैवेद्य, आरती आदींद्वारे या देवतेची आराधना केली जाते. प्रसन्नता घेऊन येणारा हा उत्सव आनंदानं साजरा होतो.

घरामध्ये बसवली जाणारी गणपतीची मूर्ती किती मोठी असावी, याबाबत अनेकांना शंका असते. याविषयी बोलायचं तर घरामध्ये प्रतिष्ठापित होणारी गणेशाची मूर्ती उत्सवमूर्ती असल्यामुळे ती साधारणत: पाच ते नऊ इंच उंचीपर्यंत असावी. घरामध्ये त्यापेक्षा अधिक उंचीची मूर्ती शक्यतो आणू नये. पूर्वीच्या काळी मातीच्या गोळ्याला गंधानं नाक-डोळे-सोंड आदी अवयव काढून त्याचंच पूजन केलं जायचं. पुढे छापाचे (साच्याचे) गणपती आले. आता बघायला मिळणाऱ्या गणेशमूर्ती हा त्यानंतर बघायला मिळालेला बदल आहे. आता अतिशय सुबक आणि देखण्या मूर्ती बघायला मिळतात.

वास्तविक गणपती पूजन हे एक दिवसाचं व्रत आहे. पण पुढे उत्सवप्रियता अथवा अन्य काही कारणांमुळे काहींकडे तो दीड दिवसांचा तर काहींकडे त्यापेक्षा जास्त दिवस पूजला जाऊ लागला. पुढे स्वातंत्र्यपूर्व काळात टिळकांनी चळवळ सुरू केली आणि तेव्हा तो दहा दिवसांचा सार्वजनिक उत्सव म्हणून साजरा होऊ लागला. नवरात्र नऊ दिवस असतात त्या स्वरूपात गणपती दहा दिवसांचा असतो असं नाही. मात्र टिकाऊ मूर्ती येऊ लागल्यावर उत्सवप्रियताही वाढत गेली आणि लोकांकडेही नवी परंपरा रूढ होत गेली. म्हणूनच आज घराघरांतील गणपती वेगवेगळ्या दिवशी विसर्जित होतात. आताच्या काळात विभक्त कुटुंबपद्धती, नोकरी-व्यवसायामुळे येणारी अडचण वा अन्य कारणं असतील तर दहा दिवस गणपती बसवायला हवा असं बंधन नाही. कारण हा धर्मशास्त्राचा अथवा व्रतवैकल्याचा भाग नाही. त्यामुळे अडचणीच्या काळात दहा दिवसांचा गणपती दीड दिवस बसवला तरी त्यात काहीही गैर नाही. दिवस कमी-अधिक करण्याचं स्वातंत्र्य आणि सोय भाविक अंगीकारू शकतात. काही जण नवस बोलून २१ दिवसांचा गणेशोत्सव साजरा करतात. पण हा भाग त्यांच्यापुरता मर्यादित असतो.

काही लोक आदल्या दिवशी घरी गणपती आणून ठेवतात, तर काही दुसऱ्या दिवशी आणतात. गणपती नेमका कधी आणावा याविषयी लोकांच्या अनेक शंका असतात. मात्र तो अगदी आठ दिवस घरी आणून ठेवला तरी काहीही हरकत नाही, हे मी आवर्जून सांगू इच्छितो. आदल्या दिवशी सगळ्यांनी बाजारात गर्दी करायची आणि मिरवत गणेशमूर्ती आणून प्रदूषणात भर घालण्याची काहीही आवश्यकता नाही. त्याऐवजी आपल्या सोयीनुसार आधी मूर्ती घरी आणून ठेवणं अधिक श्रेयस्कर आहे. स्थापनेच्या दिवशी गणेशाची प्रतिष्ठापना केल्यानंतरच त्यात देवत्व येतं. हे मंत्रानं आवाहन आहे आणि मंत्रानं विसर्जन आहे. त्यामुळेच याविषयीच्या चिंता न बाळगणं हे उत्तम. याचबरोबर घरामध्ये गर्भवती असेल, तर गणेशाचं विसर्जन करावं की नाही, याविषयीही स्पष्टता नसते. इथे लक्षात घ्यायला हवी की स्थापना आहे त्याचं विसर्जन करावंच लागतं. त्यामुळे घरात गर्भवती असली तरी पार्थिव गणेशमूर्तीचं विसर्जन करण्यात काहीही गैर नाही. याबाबतची भीती अथवा शंका बाळगू नये. गणेशाचं विसर्जन आणि घरात गर्भवती असणं या दोन गोष्टींचा एकमेकांशी सुतराम संबंध नाही. ही केवळ अंधश्रद्धेतून आलेली भीती आहे.

गणेश पुराण फार प्राचीन आहे. त्यातून बऱ्याच कथा आलेल्या आहेत. पार्वतीनं मातीचा अंगरक्षक बाहेर उभा केला आणि तो गजानन झाला, ही कथा आपण जाणतो. प्रत्येक युगामध्ये गणपतीचे अवतार आहेत. माघामध्ये गणेश जयंती असते, तेव्हा गणपतीच्या वेगळ्या अवताराचं पूजन केलं जातं. चैत्रामध्ये पुष्टीपती विनायक जयंती साजरी होते. मात्र या अवतारांचं पूजन केवळ गणेश मंदिरांमध्येच केलं जातं. म्हणजेच स्थापित मूर्ती असणाऱ्या देवालयांमध्ये या पूजा केल्या जातात. त्या घरात केल्या जात नाहीत. मात्र भाद्रपदातील गणेश जयंती घरोघरी साजरी केली जाते. गणपतीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करावी आणि जलामध्ये विसर्जन करावं असं सांगितलं आहे. म्हणजेच त्यासाठी नदी, तलाव अथवा समुद्र हवा अशी कोणतीही अट नाही. त्यामुळेच पर्यावरण रक्षणाचं भान ठेवून सर्वांनी घरामध्येच विसर्जन करण्याचं धोरण ठेवणं योग्य ठरतं. ही काळाची खूप मोठी गरज आहे हे आपल्यापैकी प्रत्येकानं जाणून घ्यायला हवं.

गणेशोत्सवाच्या निमित्तानं समाजप्रबोधनासाठी एक मोठं व्यासपीठ उपलब्ध होतं. पूर्वी वेगळ्या कारणांसाठी त्याचा वापर झाला, मात्र आताही अनेक कारणांसाठी त्याचा वापर करून घेणं शक्य आहे. त्याचाच एक भाग म्हणून अनेक संस्था, बँका व्याखानमालांचं आयोजन करायच्या. पण पुढे पुढे त्या केवळ व्याखानमाला राहिल्या नाहीत, तर त्यात संस्थेच्या काही कार्यक्रमांची भर पडत गेली. सध्या काही महत्त्वाची मंडळं रक्तदानासारखे उपक्रम राबवतात, गरीब रुग्णांच्या आरोग्यरक्षणासाठी काम करतात, रुग्णवाहिका पुरवून सामाजिक दायित्व निभावण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. हे प्रबोधन नसलं तरी सामाजिक कार्य म्हणून निश्चितच वेगळं महत्त्व राखून आहे. त्यामुळेच त्यांचा आदर्श पुढे ठेवत अन्य मंडळांनी आपला खारीचा वाटा उचलण्यास काहीच हरकत नाही.

गणपती ही विश्ववंद्य देवता आहे. तो संपूर्ण देशभर तसंच जगातील अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या रूपात पूजला जातो. आपल्याकडे त्याला संकटनाशन म्हणून संबोधलं आहे. म्हणूनच कोणत्याही पूजेच्या आधी आपण सुपारीच्या गणपतीची पूजा करून ‘हे कार्य निर्विघ्न पार पडू दे’ अशी त्याला विनंती करतो. त्यानंतरच पुढची पूजा वा मंगल कार्याची सुरुवात होते. तो बुद्धीचा दाता आहे. त्या अर्थानं त्याची पूजा होते. एकीकडे गणेशाची अशी महती असताना, अशी बुद्धी-कलेची ही देवता असताना त्याची स्थापना आणि विसर्जन मिरवणुकीत बऱ्याच अनिष्ट आणि अशिष्ट्य बाबींची भेसळ बघायला मिळाली. पण आता स्थिती थोडी बदलत असल्याचं दिसून येतं. अगदी काही वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेशमंडळं हिंदी गाणी अतितीव्र आवाजात वाजवायची. आता त्याचं प्रमाण खूप कमी झालं आहे. बऱ्याच अंशी आता गोंगाट अथवा नाचाचे प्रकार मिरवणुकीपर्यंत सीमित झालेले दिसतात. ही निश्चितच सकारात्मक बाब म्हणावी लागेल. अशा प्रकारे समाजामध्ये उपद्रव निर्माण करणाऱ्या सार्वजनिक मंडळांवर अंकुश ठेवला, तर हे प्रमाणही कमी होण्याची आशा आपण बाळगू शकतो. हे होणं गरजेचं आहे कारण प्रदूषण आणि पर्यावरण रक्षण हे ध्वनीशी देखील संबंधित आहे. अलीकडेच आपण भयानक साथरोग बघितला. त्याचे घातक परिणाम अद्यापही काही जण भोगत आहेत. अनेक रुग्णालयांमध्ये आजही रुग्णांची गर्दी बघायला मिळते. यंदा सगळ्याच गणेश मंडळांनी याचं भान ठेवून वागण्याची गरज आहे.

गणपती हा आनंद देणारा ‘मोदक’ आहे. मोद म्हणजे आनंद! उत्सव चांगल्या प्रकारे पार पाडून आपण आनंदाच्या या देवतेला अभिवादन करायला हवं. आपला हा संपन्न वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवायला हवा. घरातल्या मंडळींनी यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे. आपल्याला कोणी आरती पाठ करायला लावली का? याचं उत्तर नाही असं आहे, कारण गणपतीच्या दिवसांत रोज कानी पडून ती आपोआप पाठ होते. आपल्यावर अनायसे तो संस्कार झाला आहे. याचीच पुढची कडी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यासाठीच विभक्त कुटुंब असलं तरी किमान दीड दिवसांचा गणपती बसवायला हवा. यातून मुलांना या देवतेविषयी जाणवणारा आपलेपणा, प्रेम, श्रद्धा अपूर्व असते. मुळात गणेशाचा आकार त्यांना भुरळ घालणारा आहे. आपण ‘बुद्धीची देवता’ असं म्हणतो तेव्हा या देवतेची वेगळी ओळख त्यांच्या मनात निर्माण होते. इतर देवतांपेक्षा वेगळं असणारं त्याचं रूप मुलांच्या मनात ठसतं. त्याच्या गजवदनाकडे मुलं आकर्षित होतात. ‘श्रीगणेशायन:’ म्हणजेच चांगल्या गोष्टीची सुरुवात हा विचार त्यांना पाठ होतो आणि ते या शक्तिरूपाशी बांधले जातात. एक वारसा आपोआप त्यांच्यापर्यंत पोहोचतो… या विचारांनिशी यंदाचा गणेशोत्सव साजरा करू या आणि संपन्न परंपरेचे पायिक होण्याची शपथ निभावू या…!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -