डहाणू (वार्ताहर) : डहाणू उपवन संरक्षण कार्यालया अंतर्गत पारनाका येथील सागरी कासव संक्रमण व उपचार केंद्राकडून उपचारानंतर नऊ सागरी कासवांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात खोल समुद्रात सोडण्यात आले. वन कर्मचारी, प्राणीमित्र यांनी बोटीतून कासवांना समुद्रात सोडण्याचा उपक्रम काही वर्षांपासून हाती घेतला आहे.
या केंद्रात सध्या वीस कासवांवर उपचार सुरू असल्याची माहिती वन विभागाने दिली. लाटांसह जखमी कासवे किनाऱ्यावर आढळल्यास मच्छिमार कासवांची माहिती वन विभागाला देतात. वन विभाग आणि वाईल्ड लाईफ कंझर्व्हशन अँड एनिमल वेल्फेअर असोसिएशन या प्राणीमित्र संस्थेचे स्वयंसेवक इ. सागरी कासव संक्रमण व उपचार केंद्रात ही सेवा केली जाते.
या केंद्रात उपचारानंतर कासवांना समुद्रात सोडतात. यंदाही नऊ कासवांना समुद्रात सोडण्यात आले असून या केंद्रात अकरा कासवांवर उपचार सुरू आहेत. या कासवांचे वजन साधारणतः पाच किलो पासून ते ३० किलो पेक्षाही जास्त असते.