श्रीनिवास बेलसरे
एस. आय. शिवदासानी यांच्या रफ्तारचे (१९७५) दिग्दर्शन केले होते दिनेश-रमणेश यांनी. विनोद मेहरा आणि मौसमी चटर्जी यांच्या प्रमुख भूमिकेसह सिनेमात डॅनी डेंझोपा, मदन पुरी, मोहन चोटी, जानकीदास आणि रणजीतही होते. सिनेमात फक्त ५ गाणी असली तरी गीतकार मात्र तीन होते – वर्मा मलिक, ओंकार वर्मा आणि अभिलाष!
यातील अभिलाष यांनी लिहिलेले एक गाणे आजही अनेकांच्या स्मरणात आहे. सोनिक-ओमी यांनी दिलेल्या, गाण्याच्या आशयाला अतिशय अनुरूप अशा, संगीतामुळे ते आपल्याला सिनेमाच्या कथेच्या बाहेर नेते. नकळत मनाच्या आत असलेल्या एखाद्या गूढ अपरिचित प्रदेशात घेऊन जाते.
या गाण्यात संगीत दिग्दर्शकांनी मुकेशचा नितळ स्वर दिलाय चक्क मदनपुरी या सहसा खलनायकी भूमिका करणाऱ्या अभिनेत्याला! अर्थात ‘रफ्तार’मध्ये मदनपुरी यांनी साकारलेले जॅक्सन हे पात्र अतिशय सज्जनच आहे.
गाण्याचा अर्धा भाग मौसमी चटर्जीवर चित्रित झालाय. तिला स्वर मिळाला आहे आशाताईंचा! मौसमी चटर्जी आत्महत्या करायला जाते तेव्हा जॅक्सनने तिला वाचवले आहे. ते मौसमी चटर्जीमध्ये आपल्या हरवलेल्या मुलीला पाहत आहेत. कथेचा हा धागा पूर्णपणे बाजूला ठेवला तरी अभिलाष यांच्या लेखणीतून उतरलेले हे गाणे केवढा तरी मोठा आशय सामावून बसले आहे.
जीवनात खूप निराशा आणि दु:ख भोगलेले, पिता-पुत्रीसारखे नाते असलेले, दोघे जणू एकमेकाला दिलासा देत आहेत. अगदी थोडकीच गाणी लिहिलेल्या अभिलाष यांनी गाण्याचा कॅन्व्हाॅस, अवकाश, असा ठेवला आहे की ते कुणालाही आपल्या जीवनानुभवाशी मिळते-जुळते वाटावे. काहीसे अध्यात्माकडे झुकणारे, श्रोत्याला त्याच्या नकळत तत्त्वज्ञानाकडे नेणाऱ्या गाण्याचे मुकेशच्या सात्त्विक आवाजातील शब्द होते-
“संसार हैं एक नादिया, दु:खसुख दो किनारे हैं
ना जाने कहाँ जाएँ, हम बहते धारे हैं…”
जीवनाचा एक किनारा दु:ख, तर दुसरा सुख हा आहे. आपण मात्र या दोन्ही किनाऱ्यांच्या मधून वाट काढत, वेगाने वाहत जाणारी जलधारा आहोत. त्यामुळे जगताना दोन्ही अनुभव येणे अटळ आहे. तरीही त्यातला दिलासा हा की जीवनप्रवाह सतत पुढेच जात राहणार आहे. त्यामुळे सुख जसे शाश्वत नाही तसेच दु:खही कायमचे नाही, असे कवी सुचवत आहे.
ईश्वराने केलेली विश्वाची रचना न्याय्य तत्त्वांवर आधारलेली आणि अतिशय नियोजनबद्ध आहे. जीवनात घडणाऱ्या कोणत्याही घटनेने माणसाने गोंधळून जाऊ नये. सर्व घटनांना काहीतरी कारण, काहीतरी अर्थ असतोच! ब्रम्हांडात युगानुयुगे एका लयबद्ध गतीत फिरत राहणारे ग्रहतारे उगाच फिरत नाहीयेत. त्यांचे नियोजनबद्ध संचालन करणारी एक शक्ती आहे. जगाचे प्रचंड व्यवहार ती महाशक्ती वाऱ्यावर सोडत नसते, तर एका सुसंगत लयीत, एकात्म तालात घडवून आणत असते –
चलते हुए जीवनकी, रफ़्तारमें इक लय है,
इक रागमें एक सुरमें, सँसारकी हर शय है,
इक तालपे गर्दिशमें, ये चाँद सितारे हैं,
ना जाने…
मनोजकुमारच्या ‘उपकार’मध्ये ‘कस्मे वादे प्यार, वफा, सब बाते हैं बातोका क्या’च्या वेळी प्राण जसा एक साधू होऊन गेलेला असतो तशाच रूपात मदनपुरीवर हे कडवे चित्रित झाले आहे. यानंतर पोरगेल्याशा, निरागस दिसणाऱ्या मौसमीच्या, तोंडी आशाताईंच्या मुग्ध आवाजतले कडवे येते –
धरतीपे अम्बरकी, आँखोंसे बरसती है,
इक रोज़ यही बूँदें, फिर बादल बनती हैं,
इस बनने बिगड़नेके, दस्तूरमें सारे हैं.
ना जाने…
निर्मिती आणि तिचा अपरिहार्य विनाश हा जगाचा नियमच आहे; परंतु विनाशातही नावनिर्मितीची बीजे सुप्त स्वरूपात पेरलेली असतात, म्हणून कवी म्हणतो इक रोज़ यही बुँदें, फिर बादल बनती हैं!
त्यामुळे सगळी रचना म्हणजे फक्त निर्माण आणि त्याचा यथावकाश विनाश इतकीच नसून त्यातून पुन्हा नवनिर्मिती अशी पुनरावर्ती आहे हा भारतीय अध्यात्म दोन बोटात पकडणारा, केवढा मोठा गंभीर आशय अभिलाष यांनी फक्त तीन ओळीत, तोही किती चित्रमयपणे, गुंफला आहे हे पाहणे रंजक ठरते.
पुढच्या कडव्यात तर कवीने प्राचीन भारतीय अध्यात्म आणि आधुनिक अमेरिकेतील अलीकडचा ‘न्यू एज’ विचार एकत्र गुंफून सुंदरपणे मांडला आहे –
कोई भी किसीके लिए, अपना
न पराया है,
रिश्तोंके उजालेमें, हर आदमी साया हैं.
कुदरतके भी देखो तो, ये खेल न्यारे हैं.
ना जाने…
आपण सर्व त्या एकाच ईश्वराची लेकरे असल्याने कुणीच कुणाला परका नाही. खऱ्या अर्थाने सगळी परस्परांची भावंडेच आहेत. एका आत्मिक नात्याच्या लख्ख प्रकाशात आपले स्वतंत्र अस्तित्व गृहीत धरणे हीच मानवी मनातील संकुचितपणाची काळी सावली ठरते, हा विचार फार मोठा आहे. तो अभिलाषजींनी उत्कटपणे आणि अगदी चित्रमय लिपीत मांडला आहे!
यानंतर मुकेशच्या आवाजात येणारे जॅक्सनच्या तोंडी आलेले कडवे त्याच्या क्षमाशील धर्माचे आणि चिरंतन श्रद्धेचे जणू सारच बनले आहे –
है कौन वो दुनियामें, ना पाप किया जिसने,
बिन उलझे काँटोंसे, हैं फूल चुने किसने,
बेदाग नहीं कोई, यहाँ पापी सारे हैं.
ना जाने…
आत्मपरीक्षण केले तर बेदाग नही कोई, यहाँ पापी सारे हैं, ही ओळही मनाला छेदून आत शिरतेच!
अशी मूळ कथेत फक्त सुरू होऊन, आपल्याला कथेच्या बाहेरील मोठ्या अवकाशात घेऊन जाणारी, मनाला शांत आणि चिंतनशील करणारी, भजन नसूनही अध्यात्मिक आशय मनाच्या मदरबोर्डवर अलगद कोरून टाकणारी, गाणी ऐकली पाहिजेत ना? अर्थात ती मिळणार फक्त जुन्या गंभीर प्रवृत्तीच्या गीतकारांच्या रचनातच! …आणि त्यासाठी नॉस्टॅल्जिक मूडमध्ये नेणाऱ्या जुन्या सिनेमांकडेच वळावे लागणार!