Friday, July 19, 2024
Homeसाप्ताहिककोलाजकोकणचा गणेशोत्सव आणि पदार्थांची रेलचेल

कोकणचा गणेशोत्सव आणि पदार्थांची रेलचेल

सतीश पाटणकर

महाराष्ट्राच्या रचनेत भौगोलिक वैशिष्ट्यांनी समृद्ध असलेला निसर्गसंपन्न प्रांत म्हणजे कोकण. कोकणातील गणेशोत्सव कुटुंबाला बांधणारा, रक्ताची नाती जवळ आणणारा, उत्साहाचे, आनंदाचे वातावरण निर्माण करणारा आहे. पाहुणे, मुलांची धम्माल, जुन्या-नव्या पिढीसोबत गप्पा, नाच-गाण्यांच्या कार्यक्रमांची जागरणं, सासर-माहेरची माणसं एकत्र येणं असा हा ऊर्जावर्धक सण आहे. कोकणातील गणेशोत्सवाला धार्मिक, कौटुंबिक, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक असे अनेक पैलू आहेत. घरी गणेशाचे दर्शन घ्यायला येणाऱ्या पाहुण्यांसमोर करंज्याचं ताट पुढे केलं जातं. गणपती आला की, मालवणी मुलखात घरोघरी करंज्या बनविल्या जातात. गावभरातील बहुतेक लोक आरतीसाठी घराघरांत जातात.

शेजारी-पाजारी, नातलग, पाहुणे श्रीचे दर्शन घेण्यासाठी येतात. त्यावेळी करंज्यानी भरलेले ताट त्यांच्यासमोर येते. कोकणात पिठाच्या किंवा साखरेचे सारण असलेल्या करंज्या केल्या जातात. मालवणी मुलखात दिवाळीत एक वेळ करंज्या मिळणार नाहीत. मात्र गणेशोत्सवात प्रत्येक घराघरांत त्या आपल्याला मिळतील. गणपतीच्या काळात करंज्या करण्याची प्रथा अनेक वर्षांपासून सुरू आहे. याच दिवसांत करंज्या, मोदक, पंचखाद्य, लाडू असे फराळाचे पदार्थ घरी बनवले जातात. अगदी सगळ्या घरात हमखास गोडाधोडाचे पदार्थ बनवण्याचे वर्षांतले हेच दिवस असतात.

हरितालिका पूजनात गृहिणी व्यस्त असतानाच शेजाऱ्या-पाजाऱ्यांकडून शहाळं-केळं भेट म्हणून आलेलं असतं. पंचमी दिवशी दीड दिवसांचे गणपती जातात. त्याच दिवशी ऋषिपंचमी साजरी केली जाते. अळू, कंदमुळं आदी पाच भाज्यांची चविष्ट भाजी त्या दिवशी बनवली जाते. उंदरबी असल्याने उंदराला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. याच दिवसांत गौरींचं आगमन होतं. कोकणांमध्ये गणपतीच्या शेजारी गौरीची स्थापना करतात. गणपतीबरोबर येणाऱ्या गौरी सणालाही एक वेगळं वलय आहे. कोकण प्रांतात सर्वप्रथम निघणारे धान्य, बाजरी, कुळीथ आदींची देखभाल व्हावी म्हणून केळीच्या पानावर पाच खडे आणावेत व हे खडे जलदेवता म्हणून पूजावेत असाही गौरी व्रताचा संबंध आहे. गणपतीच्या पाठोपाठ तीन दिवसांसाठी माहेरपणाला गौरी येतात. गणपतीपेक्षा गौरींच्याच खाद्यपदार्थाचा थाटमाट काही और असतो.

कोकणांमध्ये गौराईच्या पूजनाची आणि तिच्या होणाऱ्या लाडकौतुकाची पद्धत पावलापावलांवर बदलत जाते. काही ठिकाणी गौरीच्या नैवेद्यात माठ व मिक्स भाजी बनवली जाते. काही ठिकाणी अंबाडीची भाजी, तर काही ठिकाणी १६ भाज्यांची मिक्स अथवा १६ वेगवेगळ्या भाज्या बनवल्या जातात. इथल्या गौरीही निसर्गाशी नाते सांगतात. इथे खड्याच्या गौरी पुजल्या जातात. नदी किंवा विहिरीजवळचे दगड घेऊन त्यांची गौरी म्हणून पूजा केली जाते. बांबूची रोवळी घेऊन त्यात थोडे तांदूळ पसरवले जातात. हरणे, तेरडा, आघाडा, एखादी पालेभाजी आणि हळद अशा सगळ्या वनस्पतींची रोपे घेऊन ती दोऱ्याने बांधून रोवळीत ठेवली जातात. ही रोवळी विहिरीवर किंवा नदीवर नेऊन त्यात तिथलेच खडे ठेवून त्यांची पूजा केली जाते. घरातील जी महिला गौरीची पूजा करून तिला घरी आणणार असते, तिच्याशी गौरी घरी येईपर्यंत कोणीही बोलत नाही. पूजनाच्या दिवशी ओवसे भरले जातात. यात सुपांमध्ये सुकामेवा, फळे भरून पतीला आणि जवळपासच्या महिलांना ही सुपे दिली जातात. ओवसा दिल्यानंतर पती एखादी भेटवस्तू किंवा पैसे त्यावर ठेवतो. या दिवशी गौरीसाठी पाच भाज्यांचा नैवेद्य केला जातो. त्यात काही रानभाज्यांचाही समावेश असतो. गौरीच्या पूजेत वापरल्या जाणाऱ्या पत्री, नैवेद्यातील भाज्या सगळ्यातच वापरली जाणारी पाने औषधी गुणधर्माची असतात. अवाजवी सजावट आणि महागड्या नैवेद्यांपासून कोकणातील गौरी आजही दूर आहेत, हे विशेष.

गणपती आला म्हणजे मोदक आलेच. त्यामुळे कोणत्याही शुभकार्याची सुरुवात जशी गणपतीच्या पूजेने होते तशीच गणपतीच्या खाऊची ओळखही मोदकापासूनच होते. तांदळाच्या पिठाची उकड घेऊन त्याची कणिक मळून त्याच्या हातावर गोलाकार पाऱ्या करून त्यामध्ये भरलेलं ओल्या नारळाचं गोड सारण म्हणजे मोदक. गणेशोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसांत घराघरांमध्ये असे मोदक बनवले जातातच.

गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस भाद्रपद शुक्ल पंचमी म्हणजे ऋषी पंचमी. या दिवशी करण्यात येणारी मिक्स भाजी किंवा मिसळीची भाजी म्हणजेच ऋषीची भाजी होय. पण ही आपली नेहमीची मिक्स भाजी नाही. या भाजीची काही वेगळी वैशिष्ट्ये आहेत. म्हणून फक्त आपोआप उगवलेल्या किंवा अंगणातल्या भाज्या वापरण्याची परंपरा आहे. या भाजीत फळभाज्या, पालेभाज्या आणि कंदमुळे अशा प्रकारच्या भाज्या वापरल्या जातात. तिखटपणा येण्यासाठी फक्त हिरव्या मिरच्या वापरल्या जातात. ऋषी पंचमीचे व्रत-उपवास हे आपल्या सप्तर्षीचे स्मरण आणि आदर व्यक्त करण्यासाठी केले जाते. रानात मिळणारी फळं, भाज्या आणि कंद हेच त्यांच्या आहारात असे. ऋषी पंचमीच्या या जेवणातून एक प्रकारे ऋषींच्या सात्त्विक आहाराची आणि त्यांच्या जीवनशैलीची झलक अनुभवायला मिळते.

ब्राह्मणांच्या काही पोटज्ञातींमध्ये ऋषीपंचमीच्या दिवशी खव्यारव्याचे मोदकदेखील बनवले जातात. पावसाळ्याच्या दिवसांत मोठ्या हिरव्या आणि पांढऱ्या सालीच्या दुधीभोपळ्याच्या आकाराच्या काकड्या भरपूर प्रमाणात व स्वस्त मिळतात. याच काकडीपासून एक चविष्ट गोड पदार्थ देशस्थ ब्राह्मणांकडे गौरींना बनवला जातो, ज्याला काकडीचे सांदण असे म्हणतात. मणगणं हा गोव्यामधील आणि कोकणांमध्ये पारंपरिक खाद्यपदार्थ आहे. गणपती बाप्पा हे सगळ्यांच्या सोयीनं आपला मुक्काम ठेवतात. कुणाकडे दीड दिवस, कुणाकडे पाच दिवस, कुणाकडे गौरी-गणपती, कुणाकडे दहा दिवस असा सगळ्यांच्या सोयीनं गणपती बाप्पा त्या-त्या घरी राहतो. या दिवसांत घरोघरी सकाळ-संध्याकाळ आरतीचे आवाज ऐकू येतात. आरतीनंतर प्रसाद तर हवाच. पंचखाद्य हा खिरापतीचाच एक प्रकार. फक्त सुक्या खोबऱ्याऐवजी यात ओलं-खोबरं वापरतात. रव्याच्या शिऱ्यापेक्षा कणकेचा शिरा अत्यंत खमंग लागतो. झमगमती मखरे, लायटिंगचा लखलखाट, डीजेचा दणदणाट आणि महागडा नैवेद्य यापासून कोकणातला गणपती आजही अलिप्त आहे. माळावर, परसबागेत उगवणारी फळे, फुले, पत्री, घरगुती पक्वान्न आणि भजनाच्या सुरांवर तो समाधानी असतो, ५-१० दिवस अगदी घरचाच असल्यासारखा राहतो. विसर्जनाच्या दिवशी ‘म्हामदं’ घातलं जातं. यावेळी पाच भाज्या केल्या जातात. उसळ, वडे हमखास असतात. खीर किंवा तत्सम गोडाचा पदार्थ केला जातो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -