मृणालिनी कुलकर्णी
श्री गणेशाय नमः! श्रीगणेश बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक, म्हणून सर्व प्रकारच्या शुभकार्यात, कार्यारंभी श्रीगणेशाचे पूजन केले जाते. गणेशोत्सव हा हिंदू धर्मियांचा महत्त्वाचा सण; आपल्या अस्मितेचा, परंपरेचा, भक्तीचा, श्रद्धेचा प्रतीक आहे. गणेशोत्सव सुरू करण्यामागे लोकमान्य टिळकांचे विचार, उद्दिष्ट, तो काळ आज राहिला नाही.
सर्वांच्या मनांत श्रीगणेशाविषयी श्रद्धा असली तरी आजचे गणेशोत्सवाचे रूप मेगाइव्हेंट झाले असून वळण श्रद्धेपेक्षा दिखाऊपणाकडे झुकते. फार मोठी आर्थिक उलाढाल असलेला गणेशोत्सव पूर्वी कुटुंबात एकाच्याच घरी असायचा. सारे कुटुंब त्या घरी एकत्र येत. नकळत भावंडांत आपुलकी वाढत होती. आज घराघरांत गणपतीमुळे वातावरणच बदलले आहे. मोठ्या सोसायटीतसुद्धा तीन-चार ठिकाणी गणपती मंडप पाहतो. समाजात गल्लोगल्लीच्या मंडपात श्रीगणेशाचे दर्शन होते. मंडळाच्या चढाओढीत आपली गणेशमूर्ती आकर्षक, भव्य रेखीव वेगळ्या वैशिष्ट्यासहित असावी, यासाठी पीओपी, रासायनिक रंग, सभागृहाच्या सजावटीसाठी थर्मोकोल, प्लास्टिक, थोडक्यात विघटन न होणाऱ्या पदार्थांचा वापर वाढला. भर रस्त्यात मंडपसाठी रस्ता उकरणे. वाहतुकीस अडथळा, सर्वत्र ध्वनिक्षेपकाचे आवाज, विजेची रोषणाई, वर्गणीसाठी, दर्शनाला येणाऱ्या सामान्य भाविकांशी, मंडळाच्या काही सेवकांची भाषा/ वागणूक पाहता सामाजिक एकोपा दूरच राहतो. नुसता झगमगाट नि भपका. दर्शनाला जाताना प्रसाद, हार, फुलांसाठी प्लास्टिकच्या पिशवीचाच वाढता वापर. विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी आपण पूजलेले गणपती समुद्रात इतस्ततः पडलेले पाहता मन विषण्ण होते. धुमधाम पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याने पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाले आहेत. गणेशोत्सव धार्मिक न राहता ग्लोबल झाला आहे. सगळ्यांचेच अतिक्रमण. कशासाठी हे सारे? गणेशोत्सव हा आपला पारंपरिक आणि सांस्कृतिक ठेवा जपायलाच हवा. यासाठी प्रत्येक टप्प्याला पर्याय आहे.
प्रत्येक सण निसर्गाशी निगडित असतो. निसर्गाचे पर्यायाने पर्यावरणाचे रक्षण करणे हाच सर्व सणांचा मूळ उद्देश असतो. पर्यावरणपूरक गणेशोत्सवात श्रीगणेशाची मूर्ती मातीची असावी, तिचा आकार आणि उंची दोन्ही मर्यादित असावे. चिकण मातीच्या, शाडूच्या मूर्ती बनविण्याच्या अनेक वर्कशॉप आहेत. मातीची मूर्ती घरी बनविल्याने त्या गणेशाच्या मूर्तीविषयी आत्मीयता वाटते. सजावटीसाठी नैसर्गिक रंग वापरतात. काहीजण घरातील धातूच्या मूर्तीचीच प्राणप्रतिष्ठा करतात.
महाग सजावटीचे सामान, फुले घेण्याऐवजी घरातीलच सामानाचा कलात्मक वापर किंवा विविध फॅन्सी, चमकदार रिच ब्रोकेड कापडाचा वापर किंवा जुन्या झाडांची फुले-पाने रंगवून किंवा हिरव्यागार पानाफुलांच्या कुंड्या, विविध आकारांची पाना-फुलांची सजावट निसर्गाशी, वृक्षाशी नाते सांगते. समईच्या मंद तेलवातीच्या उजेडात, धूप कापूरच्या सुवासात, शांत वातावरणात श्रीगणेशाचे दर्शन घेताना आपणही निसर्गाच्या जवळ जातो. मन प्रसन्न होते.
आपली पारंपरिक वाद्ये ढोल-ताशा, झांज, लेझीम वापरून वाजत-गाजत उत्साहाने श्रीगणेशाचे आगमन आणि विसर्जन करतो. फक्त तो आवाज दिवसभर चालू राहतो. टाळ्या वाजवत मुखाने केलेला श्रीगणेशाचा जयघोषही आपला वाटतो.
समाजात स्थित्यंतरे होत असतात. पण गणेशोत्सव मूळ उद्देशापासून दूर जात आहे. मोजकेच गणेशोत्सव असावेत पण ते भारतीय संस्कृतीचे प्रतीक ठरावेत. तो उत्सव नागरिकत्वाचा राहावा. लोकशाहीचा ठरावा. एक नवी सुरुवात. मूळ संकल्पना बाबा आढाव यांचे ‘एक गाव एक पाणवठा’ तसे एक गाव एक गणपती. निवडणुकीच्या वॉर्डाप्रमाणे काही भाग ठरवून तेवढ्या क्षेत्रांत एकच गणपती. गणेशोत्सवाची संख्या मर्यादित झाल्यास उत्सुकता, आकर्षण वाढेल.
श्रीगणेशाची मूर्ती शाडूची किंवा नैसर्गिक पर्यावरपूरक साहित्यापासून बनल्यास पाणी दूषित न होता मूर्तीचे विसर्जन सहज होईल. दिव्याच्या रोषणाईसाठी अधिकृत विजेची जोडणी घ्यावी. विजेच्या बचतीसाठी ठरवीक वेळीच लायटिंग लावावे. मूर्तिकार मूर्तीत जे देवत्व आणतात, ती मूर्ती आणि कलाकारांनी उभारलेला देखावा रांगेशिवाय जवळून पाहता यावा, अशी व्यवस्था करता आली, तर करावी. ध्वनिक्षेपक नसावाच. आवाजाची मर्यादा पाळत, देवघराच्या सभामंडपात, (प्रार्थनास्थळात), शांत सौम्य आवाजात उत्सवाला योग्य गाणी ऐकायला चांगली वाटतात. शांततासुद्धा लक्ष वेधून घेते.
मंडळाच्या कार्यक्रमात युवकांसाठी वेगवेगळ्या विषयावरच्या कार्यशाळा जमल्यास कायमस्वरूपी सुरू कराव्यात. तरुणांना त्यातून वाव मिळेल. स्थानिक प्रश्न किंवा स्थानिक परिसर स्वच्छ हिरवागार वर्षभर कसा राहील यासंबंधी काही करता आल्यास करावे. सोपे नाही पण अशक्यही नाही. आज इको फ्रेंडली गणपतीमुळे घराघरांतील चित्र बदलले आहे. मूर्तीच्या निवडीपासून विसर्जनापर्यंत लोकांनी पर्यावरणपूरक विचार स्वीकारला आहे.
श्रीगणेशाचे विसर्जन नेहमी वाहत्या पाण्यात करतात. जलस्त्रोत दूषित होऊ नये आणि भक्तांनाही जवळ सोपे जावे म्हणून विसर्जनासाठी, खास तयार केलेल्या कृत्रिम तलावाचा लोक वापर करीत आहेत. विसर्जनाला दुसरा पर्याय – प्रतीकात्मक गणपतीच्या मूर्तीऐवजी सुपारी पाण्यात बुडवून सुपारीचे विसर्जन करतात आणि श्रीगणेशाची मूर्ती दान करून पर्यावरणाचे रक्षण करतात. वाशीम शहरात वृक्षाची संख्या वाढावी म्हणून तेथे वेगवेगळ्या रोपटांपासून दहा फूट उंच गणेशमूर्ती साकारत विसर्जनानंतर ती रोपटी भक्तांना वाटून ते झाड जगविण्याची भक्तांकडून शपथ घेतात.
आज माणसाचे आरोग्य धोक्यात येत आहे. पर्यावरणपूरक गणपती माणसाच्या आरोग्याशी संबंधित आहे. आजही कोरोनाचे संकट आहे. तेव्हा गर्दी टाळा, अंतर ठेवा, मास्क वापरा. गणपती काहीच मागत नाही. एका मठात सुंदर पाटी होती. ‘देवाला काय द्याल?’ “शांतता”! ‘देवाकडून काय घ्याल?’ “मनःशांती!” बरोबर आहे. संस्कृतीने उत्सव दिले ते उद्बोधनासाठी, कल्याणकारी उपक्रम राबविण्यासाठी.
‘देवाकरिता मनुष्य नसून मनुष्याकरिता देवाचे अस्तित्व असते.’ बदल हवा आहे, ‘वर्गणीपासून – विसर्जनापर्यंत; मूर्तीच्या आकारापासून – कार्यक्रमाच्या सादरीकरणापर्यंत; मांडणीपासून – सजावटीपर्यंत. करू एक नवी सुरुवात – शेवटी प्रत्येकाचे विचार वेगळे, श्रद्धास्थान वेगळे. “स्वच्छतेसाठी, प्रदूषण मुक्ततेसाठी, पर्यावरणाच्या सुरक्षितेसाठी ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ ही काळाची खरीखुरी गरज आहे. करू एक नवी सुरुवात!