डॉ. लीना राजवाडे
आजच्या लेखाचा विषय जरा हटके आहे. विषय आरोग्य विषयाशी निगडित असाच आहे. फक्त आरोग्यविषयक अनेक गोष्टींचा परिणाम ज्याच्यावर होतो त्या आपल्या शरीराशी संबंधित आजचा विषय आहे. हे शरीर कसे आहे हे समजले पाहिजे. ते समजावून, जाणून घेण्याचा प्रयत्न पुढील काही लेखांमधून करू या.
लहानपणी शाळेत असताना आपण शास्त्र किंवा Biology शिकताना, डोक्यापासून पायापर्यंत आपल्या शरीराची माहिती घेतो. एवढेच नाही तर आपल्या शरीरातील विविध संस्था जसे की पचन संस्था ते मज्जा संस्थेपर्यंत अनेक विषयांशी आपली तोंडओळखही होते. पण आपल्या आयुष्यात या विषयाचा प्रत्यक्ष संबंध आहे हे लक्षात येत नाही आणि मग पुढे बरे वाटत नाही, अशा स्थितीत आपण डॉक्टरकडे जातो. औषध घेतो, पण नेमके माझे शरीर का असे आहे, याचा विचार करत नाही, गृहत धरतो किंवा दुर्लक्षही करतो.
“पाहावे आपणासी आपण” या समर्थांच्या उक्तीप्रमाणे आपण हे शरीर काय आहे याचे कायम भान ठेवले पाहिजे. भारतीय वैद्यक शास्त्र याविषयी उत्तम मार्गदर्शन करते. सुश्रुत संहिता जिला Gray Anatomy देखील मानते त्या संहितेत माणसाचे शरीर नेमके कसे आहे याबद्दल माहिती आहे. जसे आपण आधुनिक शास्त्रानुसार आपले शरीर समजून घेतो तसेच हे देखील समजून घेतले पाहिजे. षडंग म्हणजे सहा अंगे. दोन हात, दोन पाय यांना जोडून असणारे मध्य शरीर आणि (मान व डोके मिळून एकच) शिर अशी आपल्या शरीराची ६ मुख्य अंगे आहेत. या प्रत्येक अंगाची प्रत्यंगे (उप अंगे) आहेत. प्रत्येक हात आणि पाय हा अस्थी, हाडे, स्नायू, रक्त सिरा, मांस यांनी बनलेला आहे. हात आणि पाय हे मुख्यत्वे शरीराची हालचाल करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. या दोन्ही अंगात सांधे असतात. सांधा हा फक्त हाडांचा नसून त्यात वर सांगितलेल्या सर्व घटकांचा अंतर्भाव होतो. या सर्व घटकांचे आरोग्य उत्तम राहिले तर शरीराची हालचाल व्यवस्थित होते. पुढील अंग म्हणजे अंतराधी किंवा मध्य शरीर. यात ऊर किंवा छाती, कोष्ठ किंवा उदर या दोन भागांचा समावेश होतो. हृदय, फुप्फुस, यकृत, प्लीहा आणि इतर असे एकूण पंधरा अवयव यात आहेत. हे सर्व अवयव अतिशय मृदू असतात. त्यांच्यावर अर्थातच संरक्षणार्थ छातीचा पिंजरा, पोटावर मेदाचे कुशनिंग असते. शेवटचे, सहावे महत्त्वाचे अंग म्हणजे शिर. यात मान आणि डोके यांचा समावेश होतो. कान, नाक, डोळे, जीभ ही ज्ञानेंद्रिय या शिरात असतात. व्यवहारात याला आपण उत्तमांग असा शब्द वापरतो. उत्तम म्हणजे सर्वात वरचे अंग असा याचा अर्थ आहे.
·
आता आपण जाणून घेऊ या माहितीचे महत्त्व काय आहे. शरीराचे मुख्य भाग नेमके कोणते हे समजले तर त्या अवयवाचा नेमका उपयोग कशासाठी करायचा, काळजी कशी घ्यायची याची जाणीव व्हायला सुरुवात होईल. जसे की हात, पाय हे हालचालींसाठी आवश्यक असणारे अवयव आहेत. त्यामुळे याचा उपयोग करताना अधिक सजगतेने काळजीपूर्वक करण्याची सवय करू. याप्रमाणेच हात आणि पाय हे हाडे, रक्त, स्नायू पेशी या अनेक गोष्टींनी बनले आहे. तेव्हा त्या सर्वांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करता येतील. नव्हे किंबहुना व्यापक दृष्टी होण्यासाठी ही माहिती उपयोगी पडेल. रक्त नव्हे तर रक्तापासून तयार होणारे स्नायू यांच्याही पोषणासाठी रक्त पोषक गोष्टी यांचाही वाटा महत्त्वाचा असतो, हे आपण समजावून घ्यायला सुरुवात करू.
·
आता षडंगाचे आरोग्य चांगले कसे ठेवावे तेही थोडक्यात पाहू. शिर किंवा मस्तिष्क आरोग्य चांगले राहण्यासाठी काय करावे – शोक, उपवास, अति प्रमाणात व्यायाम, कोरड्या गोष्टी खाणे, कमी जेवणे हे टाळावे. त्याचप्रमाणे खूप गरम, आंबट, खारट गोष्टी खाणे टाळावे. याचे प्रमुख कारण डोक्यात रक्ताचा प्रवाह जास्त असतो. वरील गोष्टींमुळे रक्तातली अम्लता वाढते, रक्तावरील दाब वाढू शकतो. ज्ञानेन्द्रिंयाचा कामात अडथळा येऊ शकतो. मोतिबिंदू, कानाच्या विकृती लवकर निर्माण होतात. तेव्हा ह्याचा नक्की विचार करावा. कारण prevention is better than cure.
पुढील लेखात याविषयी अधिक जाणून घेऊ.
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पहलगाम…
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांची ट्विटर पोस्ट चर्चेत नवी दिल्ली : पहलगाममध्ये पर्यटकांवर मंगळवारी झालेल्या दहशतवादी…
सातारा: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटाचं शूट…
मुंबई : बॉलीवूड (Bollywood) चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गेल्या काही दिवसांत…
उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण जम्मू…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.…