अॅड. रिया करंजकर
सीताबाई त्या दिवशी कामाला आल्या त्या रडवेला चेहरा घेऊन. त्यांच्या मालकिणीचं त्यांच्याकडे लक्ष गेलं. आज सीतेचा चेहरा रडवेला का? हा प्रश्न त्यांना पडला, कारण गेली अनेक वर्षं सीताबाई त्यांच्याकडे कामाला होत्या. त्यामुळे त्या सीताबाईंना चांगल्याच ओळखत होत्या. किती संकटं आली तरीही बाई हसतमुख अशीच राहणारी होती. आज अचानक काय झालं, हे मालकीणीलाही समजेना म्हणून न राहून मालकिणीने तिला विचारलं, सीताबाई नेमकं काय झालेलं आहे, तुमच्या चेहऱ्यावरून ते समजत आहे. त्यावेळी मालकीणीने प्रेमाने आपली विचारपूस केली. यामुळे सीताबाईंचा दाटून ठेवलेला हुंदका बाहेर पडला. आणि सीताबाई अक्षरश: व ओसाबोक्शी रडायला लागल्या. त्यांच्या मालकिणीला नेमकं काय झालं ते समजेना. रडता रडता सीताबाई सांगू लागल्या, बाई माझी घोर फसवणूक झाली हो. माझी कष्टाची कमाई लुटली गेली हो. मालकिणीने सविस्तर काय झाले ते सांग असं सांगितलं, तरच आपल्याला काहीतरी मार्ग मिळेल, असं सीताबाईंना सांगितलं. त्यावेळी सीताबाईंना थोडा धीर आला आणि त्या सांगू लागल्या.
सीताबाई या साठीच्या घरातली. वयाने झाल्या तरी अजूनही ती लोकांकडे घरकाम करत होती आणि आपला उदरनिर्वाह करत होती. सीताबाईंना एकूण तीन मुली. मुलगा नाही आणि पतीचे निधन झालेलं. तेव्हा कष्ट करून त्यांनी तिन्ही मुलींना लहानाचं मोठं केलं. लोकांच्या घरात धुणी-भांडी करून आपला उदरनिर्वाह चालवला आणि या कष्टातच त्यांनी तिन्ही मुलींची लग्न लावून दिली. मुली आपल्या संसारात रममाण आहेत, तरीही कष्ट करणारा जीव घरात बसवत नाही म्हणून अजूनही त्या लोकांची धुणी-भांडी करतात आणि त्यांच्यावर अनेक लोकांचा विश्वासही आहे. पै पै करून त्यांनी गावी छोटंस घरही बांधलं. नवऱ्याच्या निधनानंतर स्वकष्टाने त्यांनी सर्व मिळवलं होतं. त्यांच्यामुळे गावातील त्यांना मान होता. दहा वर्षांपूर्वी त्यांच्या मुलीच्या शेजारी राहणाऱ्या उत्तर प्रदेशीय जयप्रसाद याने सीताबाईंना विनंती करून एका नवीन कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी भाग पाडलं होतं. दर महिन्याला तुम्ही तुमच्या कष्टाचे पैसे या कंपनीत गुंतवा पुढे तुम्हाला त्याचा फायदा होईल व एक वर्षानंतर थोडी थोडी रक्कम तुम्हाला मिळेल, असा विश्वास त्यांनी सीताबाईंमध्ये निर्माण केला आणि त्यांचं असलेलं ऑफिस त्यांना दाखवायला घेऊन गेले. ऑफिसमध्ये कसं काम काय चालतं, हे त्यांनी दाखवलं त्याच्यामुळे सीताबाईंचा त्याच्यावर विश्वास बसला आणि बँकेपेक्षा आपल्याला इथे फायदा होईल, असं त्यांना वाटलं. कारण त्या शिकलेल्या नव्हत्या. अशिक्षित होत्या. त्याच्यामुळे त्या जयप्रसादवर त्यांनी विश्वास ठेवला आणि दर महिन्याला थोडी थोडी रक्कम ते त्याच्याकडे भरायला लागले. जय प्रसादने त्यांना कंपनीचं पासबुकही आणून दिलं व भरत असलेल्या पावत्याही तो देत होता. सीताबाईंसारख्या अनेक लोकांना त्यांनी या कंपनीमध्ये गुंतवणूक करायला भाग पाडलेलं होतं. त्याच्यामध्ये घरकाम करणाऱ्या बायका, भाजी विक्रेते लोक, छोटे दुकानदार यांचा समावेश होता. एवढ्या लोकांनी माझ्याकडे गुंतवणूक केलेली आहे, हे सीताबाईंना त्याने दाखवलं. सीताबाईंना विश्वास बसला आणि ते गुंतवणूक करू लागले. पहिल्या एक वर्षानंतर त्यांना त्या कंपनीतून वीस हजारांचा फायदा झाला, असं सांगून जय प्रसाद यांनी सीताबाई ना वीस हजार रुपये आणून दिले. त्यानंतर दुसऱ्याही वर्षी जयप्रसादने सीताबाईंना वीस हजार रुपये कंपनीकडून मिळवून दिले. बाईंचा आणखीनच त्या कंपनीवर विश्वास बसला. एका वर्षामध्ये वीस हजार रुपये मिळतात म्हणजे बँकेपेक्षा आपल्याला फायदा आहे, असं त्यांना वाटू लागलं. थोडे थोडे पैसे भरता भरता दहा वर्षांमध्ये पाच लाख रुपये त्या कंपनीमध्ये सीताबाईंनी जमा केले आणि एके दिवशी सीताबाई यांनी दहा वर्षे पूर्ण झाली म्हणून जयप्रसाद याला माझी गुंतवणुकीचे वर्ष संपले तेव्हा माझे मला पैसे द्या, असं सांगितलं असता जय प्रसाद यांनी तुमचे पासबुक द्या, असं सांगितलं. सीताबाई यांनी जय प्रसादकडे पासबुक व कागदपत्र जमा केली. भरपूर दिवस निघून गेले तरीही पैसे कसे मिळत नाहीत म्हणून त्यांनी जयप्रसादकडे त्याची चौकशी केली असता जयप्रसादने थोडा वेळ लागेल तुम्हाला पैसे मिळतील, रक्कम मोठी आहे ना, अशी उत्तरं दिली. तोपर्यंत त्यांच्या एरियामधल्या ज्या ज्या लोकांनी जय प्रसाद याच्याकडे गुंतवणूक केली होती, त्यांची मुदत संपलेली होती आणि ते लोक जयप्रसादकडे पैशाची मागणी करू लागले. त्या सर्व लोकांकडून जयप्रसाद याने पासबुक गोळा केले होते. सीताबाईला सांगितलं तसं त्यांनाही सांगितलं की, तुमची रक्कम आणून देतो, पण भरपूर दिवस होऊनही तो रक्कम देईना, तेव्हा सगळ्या लोकांना काहीतरी झालं याची कुणकुण लागून राहिली. सर्वच लोक जयप्रसादच्या मागे पैशांचा तगादा लावू लागले. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, कंपनी बंद झालेली आहे आणि ज्या कंपनीत गुंतवणूक केलेली होती, त्याचा मालक पसार झालेला आहे, तरी तुमचे पैसे मिळवून देण्याचे मी काम करत आहे. त्यामुळे कोणी चिंता करू नये. सीताबाई इतर लोकांनाही हा भयानक धक्काच होता, कारण त्यांनी दहा-दहा, बारा-बारा वर्षं त्याच्याकडे पैशांची गुंतवणूक केलेली होती. सीताबाईंसारख्या घरकाम करून पैशाला पैसा जोडून जगणाऱ्या स्त्रीला हा भयानक धक्काच होता.
स्वतःच्या इच्छा मारून तिने या कंपनीमध्ये पैसा जमा केलेला होता की, थोडं वय झालं की ते पैसे माझ्या उपयोगी येतील. माझ्या आजारपणासाठी माझ्या मुलींना मिळतील असं मनात विचार येऊन त्यांनी गुंतवणूक केलेली होती. दर महिन्याला त्याचे प्रसादकडे जात होत्या आणि पैशाची विचारणा करत होत्या. प्रत्येक महिन्याला जयप्रसाद तेच उत्तर देत होता आणि महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या गुंतवणूकदाराकडून या जयप्रसाने सगळे कागदपत्र आणि पासबुक आपल्या ताब्यात घेतली होती की, तुम्हाला पासबुकवरचे जमा झालेले पैसे आणून देतो म्हणून त्याच्यामुळे या सामान्य मध्यमवरील लोकांकडे जो पुरावा होता तो त्याने जयप्रसादच्या हवाली केलेला होता. आज सीताबाईला जयप्रसादच्या मागे पैशाचा तगादा लावून दोन वर्षं होत आलेली आहेत. दोन वर्षे झाली तरीही त्याने पैसे दिलेले नाही आणि आज परत सीताबाई जय प्रसादकडे पैशासाठी गेलेल्या होत्या आणि तेव्हाही त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिलेली होती आणि सीताबाईंना वाटलं होतं. दोन वर्षं आम्ही पैशाची वाट बघितली. आता माझ्या काय पैशांचं खरं नाही. त्या आपल्या मालकीणीसोबत रडत होत्या.
जयप्रसाद यांनी अशिक्षित लोकांना निवडलं आणि अशाच लोकांकडून गुंतवणूक केली. पैसे देण्याची वेळ आली तेव्हा या लोकांकडून पासबुक आणि कागदपत्र आपल्याकडे जमा केली. लोकांना विश्वास वाटला की, पासबुक घेऊन हा पैसे देणार. लोकांनी ती पासबुक त्यांच्या ताब्यात दिली. हुशारीने जयप्रसादने या सर्व कष्टकरी लोकांना फसवलेलं होतं. समाजात अनेक अशी लोक आहेत, जी सामान्य लोकांना गुंतवणूक करण्यासाठी भाग पाडतात आणि बँकेपेक्षा इंटरेस्ट जास्त मिळेल, असा विश्वास दाखवतात. सीताबाईंच्या मालकिणीने तुम्ही सगळ्यांनी एकत्र व्हा आणि पोलिसात तक्रार नोंदवा आणि योग्य तो सल्ला घेऊन त्याच्याविरुद्ध कारवाई करा, असा त्यांना धीर दिला.
(सत्य घटनेवर आधारित)