Monday, July 15, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलमांजरीची गोष्ट

मांजरीची गोष्ट

रमेश तांबे

एकदा एक मांजर निघाली रानात. सांगून सगळ्यांच्या कानात. ती होती थोडीशी रागात. म्हणाली, “जाते मी खरंच, येणार नाही परत!” कारण तिला माणसांचा आला होता खूपच राग! खरे तर मांजर इथेच लहानाची मोठी झाली होती. खाऊन पिऊन चांगली टम्म झाली होती. पण आजकाल तिच्या वाढल्या होत्या तक्रारी. ती करायची सगळ्यांशी मारामारी. मांजरांशी भांडायची, माणसांशी भांडायची. एका जागेवर कुठे नाही थांबायची.

ती म्हणायची, “ही काय माणसं. किती विचित्र वागतात. काहीही करतात. कधी प्रेमानं दूध देतात वाटीभर, तर कधी काठीचा फटका मारतात पाठीवर! कधी दोन-दोन दिवस उपाशी ठेवतात, तर कधी बांगडा, पापलेट, बोंबलाची पार्टी देतात. कधी हाकलून लावतात, तर कधी फिस्स्स् फिस्स्स् करून बोलवतात. जेवणाचं जाऊ द्या हो. नाही तर नाही. मी मटकावते एखादा उंदीर. पण मी आडवी गेले, तर यांना अपशकून होतो. हे म्हणजे जरा अतीच झालं नाही का! मला तर हा माझा घोर अपमानच वाटतो. म्हणून मी आता ठरवलंय. जाऊ तिकडे दूर. जिथे नसेल माणसांचा पूर. रानावनात जाऊ, जंगलातल्या प्राण्यांत राहू. तिथे मस्त मजा करू.”

मग काय मांजर निघाली जंगलाच्या दिशेने. कधी चालत, तर कधी पळत. रस्त्याने जाताना माणसं तिला बघायची. तिच्याकडे बघून फिदीफिदी हसायची. त्यामुळे मांजरीचे डोळे झाले होते लाल, ताठ झाल्या होत्या मिशा अन् फुगले होते गाल! अगदी दुपारच्या वेळेला मांजर जंगलात पोहोचली. रमतगमत जंगल बघत होती. आता तिला लागली भूक, काय बरे खावे अन् काय बरे प्यावे. तिने विचार केला फार. मग पकडले उंदीर चार. पोटभर जेऊन झाडाखाली झोपली. झोपेत तिला दिसली कुत्र्यांची टोळी. काळे काळे होते कुत्रे. पण ते होते भित्रे. त्यांना बघताच मांजरीला आला भारी राग. ताठ केल्या मिशा अन् उंच केली पाठ. गुर्रगुर्र आवाज करताच पळून गेली टोळी. त्यातच तिला जाग आली. स्वप्न आठवून तिला आले हसू. तिला वाटले, खाली धोका आहे. आपण झाडावर जाऊन बसू. मग एका मोठ्या फांदीवर मांजर बसली आरामात. बाजूला पाहाते, तर काय बिबळोबा झोपले होते घोरत. मांजरीने केले म्याँव म्याँव. तिच्या आवाजाने बिबळोबा झाले जागे. मांजरीला बघताच हसले खुदकन. झाडावरून मारली उडी पटकन. धावत सुटले जंगलाकडे. मांजरीला हसू आले गालात. मग मांजरीने मारली झाडावरून उडी, हातात घेतली बारीक छडी आणि एका उंच खडकावर जाऊन बसली.

तेवढ्यात मांजरीने बघितले दूरवर, कुणी तरी येतंय लांबवर. बघते तर काय गर्दी वाघांची. तयारी दिसतेय भेटीची. मांजर खडकावरच राहिली बसून, वाघांनी केले वंदन हसून. तेवढ्यात एक म्हातारा वाघ म्हणाला, “तू तर आहेस आमची मावशी, कुठे होतीस एवढे दिवस!” मांजर म्हणाली, “अरे मी माणसांत गेले होते राहायला. आजच आले जंगलात.” माणसांचं नाव काढताच सारे वाघ संतापले. त्यांचे अंग झाले ताठ अन् डोळे झाले लाल. सगळे वाघ लागले डरकाळ्या फोडू, मांजरीला कळेना आता काय करू.

तेवढ्यात एका वाघाने मारली मांजरीच्या अंगावर उडी… वाऱ्याच्या वेगाने मांजर लागली पळू. पळता पळता तिला दिसली जंगल सफारीची गाडी. टुणकन उडी मारून एका छोट्याशा जागेतून चढली गाडीत. गाडीतल्या लोकांनी एकच गलका केला. “अरे बघा, अरे बघा… केवढे वाघ आलेत.” मग काय माणसांनी पटापटा वाघांचे फोटो काढले हसून, तेवढा वेळ मांजर बसली सीट खाली लपून. मांजरीला कळून चुकलं. आपल्यासाठी जंगल नाही कामाचे. नको जीवन भीतीचे. आपली माणसेच बरी कधी मारतील, तर कधी प्रेमाने जवळ घेतील. तेव्हापासून कोणत्याही मांजरीने जंगलात जाण्याचे धाडस पुन्हा केले नाही!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -