प्रा. देवबा पाटील
एका गावात सुहास नावाचा एक अतिशय हुशार, तत्पर, चपळ व अत्यंत धाडसी मुलगा राहत होता. सुहासच्या गावाची नदी ही बारमाही वाहणारी नदी होती. बाराही महिने नदीला भरपूर पाणी असायचेच. नदीमध्ये खूप मोठे व अत्यंत खोल खोल असे बरेचसे डोहसुद्धा होते. ह्या डोहांमथ्ये दररोज गावातील तरुण मुलं पोहायला जायची. डोहांमध्ये मस्त डुंबायची, डोहांजवळील उंच खडकांवरून डोहांमथ्ये उड्या मारायची, सूर मारायची.
सुहासच्या गावाला जरी जवळच्या तालुक्याच्या शहराचा वारा लागलेला होता, गावात पाण्यासाठी नळयोजना होती तरीही गावातील गरीब स्त्रियांना दररोज नदीच्या काठावरील खडकांवर कपडे धुण्यासाठी जावे लागत होते. त्यामुळे रोजच कुणी ना कुणी गरीब स्त्रिया आपल्या घरचे ओले कपडे टोपल्यात घेऊन नदीकाठी धुणे धुवायला जायच्या. नदीच्या सखल व उथळ भागाच्या काठावरील खडकांवर त्या आपापली धुणी धुवायच्यात. त्यांच्यासोबत त्यांची लहान लहान मुलेसुद्धा यायचीत. त्या आपापसात गप्पा मारीत कपडे धुवायच्यात व ही लहान मुले तेथेच समोर पाण्यात खेळायची, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवायची, त्या उथळ पाण्यात पोहण्याचा प्रयत्न करायची.
अशाच एके रविवारी सकाळी सुहास नदीमध्ये पोहण्यासाठी चालला होता. जाता जाता दुरून तो त्या स्त्रियांच्या धुणे धुण्याची गंमत बघत चालत होता. त्या स्त्रिया आपापसात गप्पा करीत आपापली धुणी धुण्यात गुंग होत्या. नेहमीसारखी लहान मुलं थोडी बाजूला एकमेकांची अंगावर पाणी उडवत, हसत खिदळत उथळ पाण्यात खेळत होती. पाण्यात डुबक्या मारीत होती. त्या स्त्रियांचे काही आपल्या मुलांकडे लक्ष नव्हते. सुहास त्यांच्यापासून थोडे दूर पोहण्यासाठी पुढे डोहाकडे जाऊ लागला. एवढ्यात सुहासचे लक्ष त्या डोहात डुबक्या खाणाऱ्या एका मुलाकडे गेले. तो मुलगा पाण्यात बुडून राहला आहे हे चतुर अनंदच्या चटकन लक्षात आले. “अहो काकू, कुणी तरी मुलगा बुडत आहे,” असे ओरडतच सुहास तिकडे धावला. धावता धावताच त्याने तत्परतेने आपल्या अंगावरील कपडे काढून फेकले व डोळ्यांचे पाते लवण्याआधीच त्या डोहात उडी टाकली.
त्याचा आवाज ऐकून हातचे धुणे सोडून बायाही आपापल्या मुलांना घेऊन तिकडे धावल्या. जिचा मुलगा दिसला नाही तिने जोरजोराने रडण्यास सुरुवात केली. ती सुद्धा डोहात उडी घेण्यास धावली; परंतु सोबतच्या बायांनी तिला पक्के धरून ठेवले. एव्हाना सुहास पोहत पोहत त्या बुडत्यापर्यंत पोहोचला होता. सुहासने पटकन आपल्या डाव्या हाताने त्याच्या डोक्याचे केस पकडले व त्याला आपल्यापासून थोडे अंतरावर धरीत उजव्या हाताने पोहत किनाऱ्याकडे आला. काठाजवळ उथळ पाण्यात येताबरोबर सुहासने त्या मुलाला आपल्या दोन्ही हातावर उचलले व त्याला काठावर आणले. बाईचे रडणे ऐकून रस्त्याने जाणारी माणसंसुद्धा तिकडे पळत आलीत. तोपर्यंत सुहास कठावर येऊन पोहोचलासुद्धा.
नदीच्या काठावर आल्यावर सुहासने एका चांगल्या स्वच्छ जागेवर त्या मुलास पालथे निजविले. बालवीर शिक्षणात शिकविल्याप्रमाणे त्याच्या पोटाखालून हात घालून त्याला थोडे वर उचलले. त्यामुळे त्याच्या तोंडातून पाणी बाहेर पडले. नंतर त्याची मान एका बाजूला वळवून त्याच्या कमरेच्या दोन्ही बाजूंनी गुडघे टेकवून सुहास आपल्या गुडघ्यांवर बसला. नंतर आपल्या हातांच्या करंगळ्या त्याच्या पाठीच्या बरगडीवर व अंगठा पाठीच्या कण्यावर ठेवून संपूर्ण शरीर गुडघ्यांवर उचलून हातावर शरीराचा भार दिला. २-३ सेकंदांनी पुन्हा पूर्ववत आपल्या गुडघ्यांवर बसला. सुहासने असे पटापट एका मिनिटात १० ते १५ वेळा केल्याने तो मुलगा श्वास घेऊ लागला. ते बघून त्या मुलाच्या आईचा जिवात जीव आला. तिचे रडणे थांबले. ती सुहासला दुवा देऊ लागली. लोकांच्या मदतीने त्याच्या आईसह सुहास त्या मुलाला घेऊन गावच्या दवाखान्यात आला. डॉक्टरांना पटापट सर्व हकिकत सांगितली. डॉक्टरांनी त्या मुलावर उपचार सुरू केले. साऱ्या लोकांनी सुहासची खूप खूप प्रशंसा केली. सुहास आपले ओले कपडे बदलण्यासाठी आपल्या घराकडे वळला.
मुंबई : तब्बल १० कोटी रुपयांच्या बनावट 'लेटर ऑफ क्रेडिट' (LC) प्रकरणात सीबीआय न्यायालयाने तीन…
मुंबई: मंगळवारी दि २२ एप्रिल रोजी जम्मू - काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील पर्यटकांच्या…
वरळी BMW अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली हळहळ मुंबई : काही अपघात हे केवळ…
मुंबई : महायुती सरकारने (Mahayuti) महिलांच्या आर्थिक दृष्टया सक्षमीकरणासाठी 'लाडकी बहीण योजना' (Ladki Bahin Yojana)…
मुंबई: जेव्हा चित्रपट रिलीज होणार असतो तेव्हा प्रेक्षकांना तो आवडेल की नाही , चित्रपटाला यश…
नवी दिल्ली : अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…