नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये आज क्रिकेट सामना होणार आहे. दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष या सामन्याकडे लागले असून सामना पाहण्यासाठी खास नियोजनही अनेकांनी केले आहे. दरम्यान, या सामन्यापूर्वी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरस्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (एनआयटी) विद्यार्थ्यांना गटांमध्ये भारत-पाकिस्तान आशिया कप क्रिकेट सामना पाहण्यास बंदी घातली आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना सामन्याशी संबंधित कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर न ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, या नियमांचे उल्लंघन केल्यास ५ हजारचा दंड आकरण्यात आला आहे.
विद्यार्थी कल्याण विभागाच्या प्रमुखांनी याबाबत सूचना जाहीर केली आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सामना सुरू असताना आपल्याच खोलीत राहण्याची सूचना करण्यात आली आहे. दुबई येथे क्रिकेट मालिका सुरू आहे. विद्यार्थ्यांनी याकडे फक्त खेळ म्हणून पाहावे. क्रिकेट सामन्यावरून शैक्षणिक संस्था, वसतिगृहात कोणत्याही प्रकारचे बेशिस्त वर्तन, शिस्तभंग करू नये अशी ताकीद विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे.
रविवारी होणाऱ्या सामन्याच्या दरम्यान, विद्यार्थ्यांनी आपल्याच खोलीत राहावे, इतर विद्यार्थ्यांच्या खोलीत प्रवेश करू नये, क्रिकेट सामना गटाने पाहू नये असे आदेश देण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. त्याशिवाय वसतिगृहातून बाहेर काढण्याची कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.