विरार (प्रतिनिधी) : नालासोपारा रेल्वे स्थानकातून एका चिमुकल्याचे अपहरण झाल्याचे सीसीटीव्हीमुळे समोर आले होते. रेल्वे पोलिसांकडून संशियत अपहरणकर्त्या जोडप्याचा शोध सुरू केला होता. तर दुसऱ्याच दिवशी तुळींज पोलिसांकडून या जोडप्याचा शोध घेऊन मुलाची सुखरूप सुटका केली. या जोडप्याने मुलाचे अपहरण केले नव्हते तर वाट चुकलेल्या मुलाला काळजीपोटी घरी आणले होते, अशी माहिती समोर आली आहे.
भाईंदरच्या उत्तन येथे राहणारी एक कामगार महिला आपल्या दोन लहान मुलासंह गुरूवारी दुपारी वसई येथे कामासाठी आली होती. दुपारी ती कडेवरील मुलाला घेऊन पाणपोईवर पाणी पित असताना, तिचा साडेतीन वर्षांचा मुलगा अरूण हा बेपत्ता झाला. त्याचा सर्वत्र शोध घेऊनही तो न सापडल्याने त्याच्या आईने रात्री वसई रेल्वे स्थानकात तक्रार दिली होती.
वसई पोलिसांनी याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. पोलीस सर्व रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही तपासत असताना, नालासोपारा येथील फलाटवर एक जोडपे या मुलाला घेऊन जात असताना दिसले. त्याचे अपहरण झाल्याचे समज झाल्याने या अपहणकर्त्या जोडप्यांचा शोध सुरू झाला.
दरम्यान शुक्रवारी तुळींज पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे विजय नगर येथून या जोडप्याला ताब्यात घेऊन मुलाची सुटका केली. आम्हाला माहिती मिळताच आम्ही त्या मुलाचा शोध घेऊन त्याला त्याच्या आईच्या ताब्यात दिले. त्या जोडप्याला रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले अशी माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली.