मुंबई : वसई जवळच्या नायगाव रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी बंद सुटकेसमध्ये अंधेरीतील १५ वर्षीय शाळकरी मुलीचा मृतदेह आढळूल आला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून मारेकऱ्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. हत्या झालेली मुलगी गुरुवारी दुपारपासून अंधेरी येथील तिच्या घरातून बेपत्ता होती. त्यानंतर तिचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी वसईतील वालीव पोलीस ठाण्यात कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वालीव पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुलकुमार पाटील यांनी सांगितले की, शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास नायगाव रेल्वे पोलिसांना फोन आला की, नव्याने बांधलेल्या पूर्व-पश्चिम पुलाजवळील झुडपात एका मुलीचा मृतदेह पडलेला आहे. त्यानंतर घटनास्थळी पोहोचल्यावर एका बॅगमध्ये मुलीचा मृतदेह आढळून आला. संबंधित मुलीच्या पोटावर वार झाल्याच्या जखमा होत्या. त्यामुळे तिची हत्या झाली असावी असा अंदाज आहे. घटनास्थळी आढळलेल्या बॅगेत एक टॉवेल आणि काही कपडे तसेच अंधेरीतील एका शाळेचा गणवेश होता.
अंधेरी पोलीस ठाण्याच्या अधिका-यांनी सांगितले की, संबंधित मुलगी गुरुवारी सकाळी शाळेत जाते म्हणून अंधेरीतील घरातून निघाली होती. मात्र, सायंकाळपर्यंत ती घरी न परतल्याने तिच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. पालकांच्या तक्रारीनंतर अंधेरी पोलिसांनी बेपत्ता मुलगी अल्पवयीन असल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली असून, मृत मुलीला तिच्या इच्छेविरुद्ध नेण्यात आले की, ती कोणासोबत स्वच्छेने गेली होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याचा शोध घेण्यासाठी अंधेरी ते नायगाव स्थानकांवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे रेकॉर्डिंग स्कॅन केले जाणार आहे. याशिवाय मृत मुलीचे घर आणि शाळेच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही रेकॉर्डिंगदेखील स्कॅन केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.