पणजी : टिकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट हत्येप्रकरणी आता आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. गोवा पोलिसांनी फोगाट यांचे पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर वासी या दोघांना अटक केली होती. आता पोलिसांनी एका ड्रग्ज पेडलरला आणि अंजुना बीच जवळील कर्लीज हॉटेलच्या मालकाला अटक केली आहे. आरोपी सुधीर सांगवान हा ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात होता. त्यानेच या ड्रग्ज पेडलरची ओळख पोलिसांना सांगितली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्लीज हॉटेलच्या बाथरुममध्ये ड्रग्ज आढळले. सिन्थेटिक ड्रग्ज हे त्या बाथरुममध्ये मिळाले, जिथे सोनाली होत्या. त्यानंतर पोलिसांनी हॉटेल मालकाला अटक केली. आतापर्यंत सोनाली फोगाट यांच्या हत्येप्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे. सुधीर सांगवान, सूखविंदर सिंह, कर्लीज हॉटेचा मालक आणि ड्रग पेडलर या चौघांना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली आहे.
आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. त्यामध्ये सुधीर सांगवान आणि सुखविंदर वासी हे सोनाली यांच्यासोबत पार्टी करताना दिसत आहेत. सोनाली यांना जबरदस्तीने ड्रग्ज देण्यात आले होते. सोनालीला द्रव स्वरुपात ड्रग्ज देण्यात आल्याची कबुली सुखविंदरने दिली आहे. सुखविंदर आणि सुधीर सांगवान हे सोनाली फोगाट यांच्यासोबत टॉयलेटमध्ये गेले होते, तिथे २ तास थांबले. तिथे काय झाले? याची चौकशी केल्यावर सुधीर सांगवान आणि सुखविंदर वासी यांनी कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही. सध्या चौकशी सुरु असून, अधिक माहिती मिळण्याची शक्यता असल्याचे, गोवा पोलीस महासंचालक ओमवीर सिंह बिश्नोई यांनी दिली.