देवा पेरवी
पेण : गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपल्याने मुंबई ठाणेचा नोकरदार कोकणात येण्यास सुरुवात झाली आहे. गणेश भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी रायगड पोलीस प्रशासन सज्ज झाले आहेत. या मार्गावरील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून ५ उपविभागिय अधिकारी, ५० पोलीस अधिकारी व २२५ पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार असल्याचे रायगड जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक अंतुल झेंडे यांनी वडखळ येथे पत्रकार परिषदेत सांगितले
गणेशोत्सव हा कोकणवासीयांचा महत्वाचा सण मानला जातो. यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथून अनेक नोकरदार हे कोकणातील आपल्या घरी जातात. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सुमारे १४५ किलोमीटरच्या मार्गावर पोलीस कर्मचारी आणि अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. तर रायगड जिल्ह्यातील या मार्गावरील महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रणासाठी मदत होणार आहे. तर मुंबई-गोवा महामार्गावरील रहदारीच्या महत्त्वाची ठिकाण असलेल्या खारपाडा, हमरापूर, वडखळ आदी महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस चौक्यांसह, अॅम्ब्युलन्स आणि क्रेनचीसुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. गणेशोत्सव काळासाठी जिल्ह्यातील पोलीस बळाव्यतिरिक्त होमगार्ड्स व राज्य राखीव दल तैनात केले जाणार आहे.
वडखळ पोलीस स्टेशनला महामार्गावरील वाहतूक नियंत्रणा विषयीची माहीती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत रायगडचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, पेण पोलीस निरिक्षक देवेंद्र पोळ, वडखळ पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर, खालापूर पोलीस निरिक्षक बाळा कुंभार, पोलीस निरिक्षक विश्वजीत काईंगडे, पोलीस निरिक्षक पी.डी.कोल्हे, पोलीस निरिक्षक सुवर्णा पत्की, पोयनाड पोलीस निरिक्षक राहुल अतिग्रे, दादर सागरी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील आदी पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खारपाडा ते कशेडी घाट या दरम्यान सहा विभागात वाहतूक नियत्रंणाचे नियोजन केले आहे. या मध्ये ५ उपविभागिय पोलीस अधिकारी, ५० पोलीस अधिकारी, २२५ पोलीस कर्मचारी तर १० ठिकाणी पोलीस चौक्या उभारल्या असून या ठिकाणी हायड्रा, क्रेण, रुग्णवाहीका सज्य ठेवण्यात आल्या आहेत. तर महत्वाच्या ठिकाणी सी.सी.टि.व्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तर महामार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. मुंबईकर मोठ्या संख्येने गणेश उत्सवाकरीता येतील अशी अपेक्षा आहे. त्यांना कोणताही त्रास होवू नये, वाहतूक कोंडी होणार नाही अशी उपाय योजना करण्यात आली असून त्यांचा प्रवास सूखकर व्हावा यासाठी रायगड पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांचे मार्गदर्शनाखाली नियोजन केले आहे. – अतुल झेंडे – अप्पर पोलीस अधिक्षक रायगड