Tuesday, July 1, 2025

महापुरामुळे पाकिस्तानात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर

महापुरामुळे पाकिस्तानात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर

लाहोर : पाकिस्तानातील अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने सरकारने राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली आहे. पाकिस्तानात पूरात ९३७ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये ३४३ लहान मुलांचा समावेश आहे. या पुरामुळे देशातील ३० लाख लोक बेघर झाले आहेत. सिंध प्रांतात सर्वाधिक ३०६ जणांचा मृत्यू झाला आहे.


आपत्ती व्यवस्थापन विभाच्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानमध्ये ऑगस्ट महिन्यात १६६.८ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. यंदा येथील पावसात २४१ टक्के वाढ झाली आहे. सिंध आणि बलुचिस्तानला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. वातावरण बदलासंदर्भातील मंत्री शेरी रेहमान यांनी पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये वॉर रुम सुरू करण्यात असल्याचे सांगितले आहे.


पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांचा युनायटेड किंग्डम दौरा रद्द केला असून ते कतारहून परतल्यानंतर पूर मदत कार्याचा आढावा घेण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करणार आहे, अशी माहिती पाकिस्तान वृत्तवाहिनीने दिली आहे.


रेहमान यांनी मागील आठवड्यात या परिस्थितीची तुलना २०१० मधील पूरपरिस्थितीशी केली होती. मात्र त्यांनी आताची स्थिती २०१० पेक्षाही गंभीर असल्याचे सांगितले. जवळपास ३० लाख लोक बेघर झाले असून हजारो लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे अनेक लोकांकडे दोन वेळचं अन्नही जेवायला नाही असे रेहमान यांनी सांगितले.

Comments
Add Comment