महाड (वार्ताहर) : महाराष्ट्रात गुटखा जन्य पदार्थाच्या विक्रीस व उत्पादनास बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे गुटख्याची विक्री बाजारामध्ये छुप्या पध्दतीने सुरु आहे. गुटख्याचा हा माल गुजरातहून छुप्या मार्गाने महाराष्ट्रात येत असताना पोलिसांनी याबाबत कारवाई केली आहे. यावेळी गुटख्याच्या ३ बॅग पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
शनिवारी महाड आगारात आलेल्या सुरत महाड या बस मध्ये गुटख्याचा साठा असल्याची माहिती प्रभारी आगार प्रमुख शिवाजी जाधव यांना मिळाल्यानंतर त्यांनी बसची तपासणी केली. त्यात गुटख्याची पाकीटे असलेल्या तीन बॅगा सापडल्या. महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश तांबे आणि महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक मिलिंद खोपडे यांना या प्रकाराची माहिती देण्यात आली. या दोन्ही अधिकाऱ्यांनी महाड परिवहन स्थानकात येवून पंचनामा करून या गुटख्याच्या तिन्ही बॅगा ताब्यात घेतल्या. या बसच्या चालक वाहकाकडे या बॅगा कुणाच्या याची चौकशी केली असता, त्या कुणीतरी बसमध्ये विसरून गेले असावे असे थातूरमातूर उत्तर देत त्यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांना महाड शहर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
महाराष्ट्रात गुटख्या सारख्या तंबाखूजन्य पदार्थाच्या उत्पादन व विक्रीस बंदी असतानाही अन्य राज्यातून गुटखा छुप्या पद्धतीने महाराष्ट्रात येत असतो. आजपर्यत अशा रितीने बेकायदेशीर रित्या गुटखा जन्यपदार्थाची वाहतूक होताना पोलिसांनी पकडले आहे. महाड शहर व तालुक्यातही काही व्यापाऱ्यांना गुटख्याचा स्टॉक केल्याने व विक्री केल्याने पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.
गुटखा तस्करी प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल सुरत महाड एसटी बसमध्ये सापडून आलेल्या गुटखासाठा प्रकरणी पोलीस तपासाअंती या तस्करी मध्ये बस चालक अनिल महारणे, खर्डी येथील तरुण नरेश बबन महाडीक आणि त्यांचा सूरत येथील भाऊ नितीन बबन महाडीक असा तिघांचा हात असल्याचे निष्पन्न झाले आहे. या तिघांविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच बरोबर अशाप्रकारे तस्करी केलेल्या गुटख्याचा साठा महाड मधील कोणत्या व्यापाऱ्याला विक्री केला जातो याचीही माहिती उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.