Sunday, July 14, 2024
Homeक्रीडाफिफा’ची भारतावरील बंदी मागे

फिफा’ची भारतावरील बंदी मागे

भुवनेश्वर, गोवा, मुंबई येथे ११ ते ३० ऑक्टोबर दरम्यान होणार स्पर्धा

झुरिच (स्वित्झर्लंड) : जगभरातील फुटबॉलची प्रशासकीय संस्था असलेल्या ‘फिफा’ने भारतीय फुटबॉल संघटनेवर (एआयएफएफ) घातलेली बंदी उठवली आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रशासकीय समिती हटवण्याच्या आदेश दिल्यानंतर ‘फिफा’ने बंदी उठवण्याचा निर्णय घेतला. ‘एआयएफएफ’च्या होणाऱ्या निवडणुकीवर ‘फिफा’ व ‘एएफसी’ यांची नजर राहील. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व मदत केली जाईल, असेही पत्रात म्हटले आहे.

अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर (एआयएफएफ) लादलेली बंदी ११ दिवसांनी उठवण्याचा निर्णय ‘फिफा’ने घेतला आहे. या निर्णयामुळे आता कुमारी (१७ वर्षांखालील) विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘एआयएफएफ’च्या कारभारात होत असलेल्या प्रशासकीय समितीच्या हस्तक्षेपामुळे ‘फिफा’ने १५ ऑगस्ट रोजी बंदी घातली होती. ‘फिफा’ समितीने ‘एआयएफएफ’वरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला असून, त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल. याचप्रमाणे ऑक्टोबरमध्ये होणारी कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धा भारतातच होईल, असे ‘फिफा’ने ‘एआयएफएफ’ला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

तसेच, ‘फिफा’ने सांगितले आहे की १७ वर्षांखालील महिला विश्वचषक २०२२ आता पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार भारतात आयोजित केला जाऊ शकतो. ही स्पर्धा ११ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत भुवनेश्वर, गोवा आणि मुंबई येथे होणार आहे. यापूर्वी १५ ऑगस्ट रोजी ‘फिफा’ने भारतीय फुटबॉल संघटनेवर (एआयएफएफ) बंदी घातली होती. फिफाच्या नियमांचे आणि घटनेचे गंभीर उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. या निर्णयामुळे ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या १७ वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धेचे यजमानपदही भारताकडून काढून घेण्यात आले होते. ‘फिफा’च्या निलंबनामुळे भारत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकला नव्हता आणि कोणत्याही स्पर्धेत भाग घेऊ शकत नव्हता. मात्र आता बंदी उठविल्यामुळे पुन्हा एकदा सर्व मार्ग खुले झाले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -