वाडा (वार्ताहर) : डिसेंबर २०२१ मध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या आंबा पिकाचा मोहोर गळून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मात्र विमा कंपनीने नुकसानभरपाईची रक्कम निम्मीच देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली आहे. मोठ्या रकमेचा विमा घेऊन दिलेली रक्कम तुटपुंजी मिळाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत विमा कंपनीविरोधात पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
डिसेंबरमध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या आंबा पिकाचा मोहोर गळून गेला होता. त्यानंतर मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात आलेल्या उष्णतेच्या लाटेत थोड्या प्रमाणात लागलेले आंबेही गळून गेले होते. मोठ्या प्रमाणावर आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने येथील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडून नुकसानभरपाईची मागणी केली होती.
या नुकसानीची भरपाई विमा कंपनीकडून प्रति हेक्टर ६५ हजार रुपये मिळणे क्रमप्राप्त असताना फक्त ३५ हजार रुपये देण्यात आली आहे. दरम्यान याप्रकरणी वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने कृषी भूषण शेतकरी अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांची भेट घेऊन कंपनीकडून फसवणूक झाल्याच्या तक्रारीचे निवेदन त्यांना दिले आहे.
आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून आंबा पिकासाठी विमा कंपनी प्रति हेक्टरी २० हजार ३०० रुपयांचा हप्ता घेत असते. आंबा पिकाचे नुकसान झाल्यास नुकसानीची भरपाई प्रति हेक्टरी ६५ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणे क्रमप्राप्त असताना निम्मीच नुकसानभरपाई देण्यात आली आहे. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. विमा कंपनीने हप्तय़ाची रक्कम वाढविल्याने अनेक शेतकरी आपल्या फळपिकांचा विमा काढण्यासाठी पुढे येत नाहीत, असे सांगितले जात आहे.