विरार (प्रतिनिधी) : मुंबई-अहमदाबाद या मुख्य शहरांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वसई, नालासोपारा व विरार फाटा या ‘प्रवेश मार्गां’वर होणारी वाहतूक कोंडी जीवघेणी ठरत असल्याने पालिका, आरटीओ व वाहतूक पोलीस प्रशासनाविरोधात संघर्षाची ठिणगी पेटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
मुंबई-अहमदाबाद या मुख्य शहरांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग वसई, नालासोपारा व विरार या शहरांतून जातो. मागील काही वर्षांत या तीनही शहरांचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे. साहजिकच लोकसंख्या आणि वाहतुकीचे प्रमाणातही वाढलेले आहे. या महामार्गावर वसई, नालासोपारा व विरार फाटा हे या शहरात येण्याचे प्रवेश मार्ग आहेत. मुंबई, ठाणे, नाशिक व अन्य शहरांतून येणारे प्रवासी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरूनच आपल्या निश्चित स्थळी जात असतात; परंतु मागील काही वर्षांत या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाहने पार्किंग करून ठेवण्यात येत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. रस्त्यावर झालेली अतिक्रमणे तसेच पावसाळ्यादरम्यान या महामार्गावर पडत असलेले खड्डे ही प्रवाशांसमोरील आणखी एक मोठी समस्या आहे.
अतिक्रमणे, अनधिकृत पार्किंग आणि खड्डे यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. विशेषतः सकाळी व संध्याकाळी मुंबई व अहमदाबादच्या दिशेने या मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीत तासनतास वाहने खोळंबलेली असतात. परिणामी प्रवाशांना नाहक मनस्ताप होतो. वेळ आणि इंधनाचाही अपव्यय होतो. अनधिकृत पार्किंग आणि खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढलेले आहे. अनेक वाहनचालकांचा यात मृत्यू ओढवलेला आहे. अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व आलेले आहे.
त्यामुळे वसई, नालासोपारा व विरार फाटा या प्रवेश मार्गांजवळ झालेली अतिक्रमणे हटवून अनधिकृत पार्किंगवर तातडीने उपाय काढा. शिवाय महामार्गावरील खड्डे कायमस्वरूपी बुजवून प्रवाशांचा मार्ग सुखकर करा. गणेशोत्सव तोंडावर आहे, अशा प्रसंगी अनूचित काही घडणे योग्य ठरणार नाही. हे तिन्ही मार्ग सुरळीत न झाल्यास गणेशोत्सवानंतर शिवसेनेच्या वतीने जनआंदोलन करण्यात येईल. आणि या जनआंदोलनाला प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा वसई शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.