वाडा (वार्ताहर) : वाडा तालुक्यात ऐन गणपती उत्सवाच्या तोंडावर सिलिंडर गॅस दहा बारा दिवस मिळत नसल्याने ग्राहकांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे नाईलाजाने ग्राहकांना पुन्हा चुलीचा वापर करावा लागत असल्याने ग्राहक संताप व्यक्त करीत आहेत.
वाडा शहरातील आर.डी. पातकर गॅस एजन्सीकडून तालुक्यात एचपी सिलिंडर गॅसचा पुरवठा केला जातो. या एजन्सी मार्फत पूर्ण तालुक्यात गॅसचे वितरण केले जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सिलिंडर गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. शेकडो ग्राहकांनी नोंदणी करून ठेवले असतानाही, त्यांना दहा दिवसा नंतरही गॅससाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यांना सध्या तरी चुलीचाच आधार घ्यावा लागत आहे.
ग्रामीण भागात हे ठीक आहे, मात्र शहरी भागात चूल पेटवण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने त्यांनी काय करावे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कुडूस परिसरात ३२५ ते ३५० गॅसची नोंदणी झाली असून या ग्राहकांना गॅस मिळायला उशीर होत आहे. दरम्यान, गॅस उपलब्ध नसल्याने ग्राहकांची प्रचंड गैरसोय होत आहे. दरम्यान, गणपती सणापूर्वी गॅसचा मुबलकसाठा उपलब्ध करावा, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.
यासंदर्भात आर. डी. पातकर गॅस एजन्सीचे मालक सौरभ पातकर यांच्याशी संपर्क साधला असता, गणपती सणामुळे गॅसची मागणी अचानक वाढली आहे. त्यामुळे मागणीच्या मानाने तेवढा पुरवठा होत नसल्याने गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. येत्या तीन चार दिवसात पुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
यासंदर्भात नायब तहसीलदार सुनिल लहांगे यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित एजन्सीला तशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या असून गणपती सणापूर्वी सर्वाना गॅस मिळतील याची दक्षता घेण्यात येईल.
मी गेल्या अनेक दिवसांपासून सिलिंडर गॅसची नोंदणी केली आहे. मात्र अनेक दिवस उलटूनही मला गॅस मिळत नाही. त्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव चुलीचा पर्याय निवडावा लागत आहे. वसंत पाटील ग्राहक, चिंचघर पाडा