नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा अनेक खेळाडूंसाठी प्रेरणास्थान आहे. त्याचा प्रत्यय वेळोवेळी येतोच. आशिया चषक स्पर्धेत भारत-पाक लढतीआधी भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने धोनीवर कौतुकाचा वर्षाव करत त्याच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. धोनीसोबत खेळणं माझ्या कारकिर्दीतील सर्वात आनंदाचा आणि रोमांचक क्षण होता, अशी पोस्ट विराटने शेअर केली आहे.
आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान येत्या २८ ऑगस्टला आमने-सामने येणार आहेत. यापूर्वी स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसोबतचा फोटो शेअर करून एक खास पोस्ट केली आहे. “धोनीसोबत खेळणं माझ्या कारकिर्दीतील सर्वात आनंदाचा आणि रोमांचक क्षण होता”, असे विराटने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये असेही लिहिले आहे की, आमची भागीदारी माझ्यासाठी नेहमीच खास असेल. विराट कोहलीच्या या पोस्टला मोठी पसंती मिळाली आहे. कोहलीच्या या पोस्टला आतापर्यंत १७ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. कोहलीने २००८मध्ये धोनीच्या कर्णधारपदाखाली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि अनेक सामने जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कोहलीच्या कारकिर्दीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या धोनीने नंतर कर्णधारपदाची जबाबदारी उपकर्णधार कोहलीवर सोपवली.