मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कोळीवाडे हे आपले वैभव आहे. या कोळीवाड्यांचे सीमांकन करण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. या कोळीवाड्यांच्या विकासासाठी विशेष विकास नियंत्रण नियमावली तयार करण्यात आली आहे. हा विकास करताना कोळी समाजाला विश्वासात घेतले जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.
या संदर्भात संबंधित लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात येईल तसेच जेथे सीमांकन झालेले नाही तेथे नव्याने एसआरएचे प्रस्ताव मंजूर केले जाणार नाहीत, असेही ते म्हणाले. दरम्यान सदस्य सचिन अहिर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. फडणवीस म्हणाले, गावठाणांना सीआरझेड लागू होत नाही. त्यामुळे सध्याच्या नियमावलीमधील नियमांच्या अंतर्गत त्यांना दुरुस्तीसाठी परवानगी देण्याच्या सूचना विभागाला दिल्या जातील. त्यांना अधिकचा एफएसआय देण्याबाबतही शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य भाई जगताप, विजय ऊर्फ भाई गिरकर, कपिल पाटील आदींनी सहभाग घेतला.