बोईसर (वार्ताहर) : घरफोड्या रोखण्यासाठी गणेशोत्सव काळात घरे बंद करून बाहेरगावी जाणाऱ्यांनी बंद घरांच्या दारांना लोखंडी कुलुपा ऐवजी अलार्म लॉकचा वापर करण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत. इ-कॉमर्स वेबसाईटवर अल्प किंमतीत उपलब्ध असलेल्या अलार्म लॉकचा वापर करून बंद घरांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी नित्यानंद झा यांनी केले आहे. घरफोड्या रोखण्यासाठी बंद घरे असलेल्या भागात पोलिसांची गस्त वाढवण्यात येणार आहे. घरफोड्या रोखण्यासाठीच्या उपाययोजना आणि अलार्म लॉकच्या वापराचे प्रात्यक्षिक करतानाचा व्हिडीओ उपविभागीय अधिकारी नित्यानंद झा यांनी तयार करून सार्वजनिक केला आहे.
तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कामगारांमुळे औद्योगिक वसाहती लगतच्या ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झाल्याने लोकसंखेतही वाढ झाली आहे. बोईसर सारख्या भागात जिल्ह्याबाहेरचे नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. उत्सव काळात कुलूपबंद घरांमध्ये चोऱ्या आणि घरफोडी घटनांमध्ये मोठी वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. दुचाकी चोरीचे प्रमाण लक्षणीय आहे.
टाळेबंदीच्या काळात नागरिक घरातच असल्याने घरफोडी आणि चोऱ्यांचे प्रमाण घटले होते. टाळेबंदी उठवल्यानंतर सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. नोकरदार कामावर रुजू झाले आहेत, तर सण उत्सव लग्न समारंभात सहभाग आणि अन्य कारणांमुळे नातेवाईकांकडे जाणे येणे सुरू झाले आहे. जिल्ह्याबाहेरचे आणि परराज्यातील चाकरमानी गावाकडे जाऊ लागले आहेत. त्यामुळे एक दिवसांपेक्षा अधिक काळ कुलूप बंद घरामध्ये घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बोईसर तारापूर आणि वाणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत तब्बल ३७ घरफोडयांच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
या समस्येवर बोईसर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधिक्षक नित्यानंद झा यांनी उपाय शोधला आहे. लोखंडी कुलुपा ऐवजी इ-कॉमर्स वेबसाईटवर अल्प दरात उपलब्ध असलेला अलार्म लॉकच्या वापराचा पर्याय त्यांनी सुचवला आहे. अलार्म लॉकच्या वापरामुळे चोऱ्या, घरफोड्या आणि दुचाकीच्या चोरीचे प्रमाण घटण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. व्यापारी संकुलांमधील दुकानांच्या सुरक्षेसाठी सायरन बसवावा, चोरांकडून दुकानाचे शटर उचकटण्याचा प्रयत्न झाल्यास सायरनच्या मोठ्या आवाजामुळे चोरीच्या घटना रोखता येणार आहेत.
गणेशोत्सव काळात बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने घरफोडयांचे प्रमाण वाढत असते. त्यामुळे रोखण्यासाठी अलार्म लॉकचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. यासाठी बोईसर उपविभागीय कार्यालया अंतर्गतच्या तीन पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी सरसावले आहेत. अलार्म लॉकचा वापराने चोऱ्या आणि घरफोडीच्या घटना कमी होण्याची शक्यता नित्यानंद झा यांनी व्यक्त केली आहे.