मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील देवली काळेथर येथील राजन मोहन सारंग (वय ४५) हे माडावर चढले असता त्यांच्यावर गांधील माशींनी हल्ला चढवला. जखमी अवस्थेत त्यांना मालवणातील खाजगी रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, प्रकृती चिंताजनक बनल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत मालवण पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. राजन सारंग हे अविवाहित होते. माडावर चढून व मोलमजुरी करून उदरनिर्वाह करायचे. राजन हे घरापासून जवळच असणाऱ्या वाक्कर यांच्या झाडावर नारळ काढण्यासाठी चढले होते. यावेळी त्यांच्यावर गांधील माशांनी हल्ला चढवीत दंश करीत जखमी केले.
गांधील माशांच्या हल्ल्यामुळे ते तातडीने माडावरून खाली उतरले. मात्र या हल्ल्यात त्यांची प्रकृती अत्यवस्थ बनल्याने स्थानिकांनी त्यांना मालवणातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. याबाबत संतोष सोनू वाक्कर यांनी मालवण पोलीस स्थानकात माहिती दिली. त्यानुसार आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे.