Saturday, August 30, 2025

भारत ६जी लाँच करण्याच्या तयारीत

भारत ६जी लाँच करण्याच्या तयारीत

नवी दिल्ली : देशात ५जी सेवा ऑक्टोबरपर्यंत सुरू होणार असल्याची घोषणा काल केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलेली असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यापुढे जाऊन सरकार या दशकाच्या अखेरीस ६जी लाँच करण्याची तयारी करत असल्याचे सांगितले. स्मार्ट इंडिया हॅकाथॉनच्या ग्रँड फिनालेमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना पंतप्रधानांनी ही घोषणा केली.

पीएम मोदी पुढे म्हणाले, 'शेती आणि आरोग्य क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी तरुण नवीन उपायांवर काम करू शकतात. आम्ही या दशकाच्या अखेरीस ६जी लाँच करण्याची तयारी करत आहोत. सरकार गेमिंग आणि मनोरंजनामध्ये भारतीय उपायांना प्रोत्साहन देत आहे. सरकार ज्या पद्धतीनं गुंतवणूक करत आहे, त्याचा सर्व तरुणांनी लाभ घ्यावा.'

रोज नवनवीन क्षेत्रं आणि आव्हानं नाविन्यपूर्ण उपायांद्वारे शोधली जात आहेत. मोदींनी नवसंशोधकांना शेतीशी संबंधित समस्यांवर उपाय शोधण्यास सांगितले आहे. तरुण नवोदितांना प्रत्येक गावात ऑप्टिकल फायबर आणि ५जी लाँच, गेमिंग इकोसिस्टमला चालना देण्यासारख्या उपक्रमांचा पूर्ण लाभ घेण्यासही सांगितले आहे. भारत या वर्षी ऑक्टोबरपर्यंत ५जी तंत्रज्ञानाचा रोलआउट पाहण्यास तयार आहे, असेही मोदी म्हणाले.

देशात ऑक्टोबरपर्यंत ५जी सेवा सुरू होणार

याआधी एका पत्रकार परिषदेत केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, या वर्षी ऑक्टोबरपर्यंत देशात ५जी सेवा सुरू होईल, अशी शक्यता आहे. उद्योगाने ५जी पायाभूत सुविधांसाठी काम सुरू केले आहे आणि २-३ वर्षांत ते देशाच्या प्रत्येक भागात पोहोचेल. आम्ही उद्योगांना ५जी शुल्क परवडणारे आणि प्रवेश योग्य ठेवण्याची विनंती केली आहे. आमचे मोबाईल सेवा शुल्क जगातील सर्वात कमी आहे. भारतीयांना जागतिक दर्जाची ५जी सेवेची सुविधा मिळणार आहे. ५जी जलद गतीने सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व पायऱ्या अतिशय चांगल्या आणि पद्धतशीरपणे सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment