
मुंबई (वार्ताहर) : बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत पदकविजेत्या महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या बक्षीस रकमेत घसघशीत वाढ करण्यात आली आहे. राज्याचे क्रीडामंत्री गिरीष महाजन यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
इंग्लंडच्या बर्मिंगहम येथे नुकतीच राष्ट्रकुल स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारताच्या ६१ खेळाडूंनी पदक जिंकण्याची कामगिरी केली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या १४ खेळाडूंनी सहभाग घेत ७ खेळाडूंनी पदक जिंकले आहेत. पदकविजेत्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना राज्य सरकारने आधी जाहीर केलेल्या रकमेत मोठी वाढ केली आहे.
सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना १२ लाख ५० हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. त्यात मोठी वाढ करून हे आता थेट ५० लाख करण्यात आले आहे. रौप्य आणि कांस्य पदक विजेत्यांच्या बक्षिसाची रक्कमही वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्राचे क्रीडामंत्री गिरीष महाजन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. गिरीष महाजन यांनी बक्षिसाची रक्कम वाढवताना खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले.