काबूल : पाकिस्तानपाठोपाठ आता अफगाणिस्तानातही महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संयुक्त राष्ट्र आणि सत्ताधारी तालिबानच्या म्हणण्यानुसार, एका महिन्याच्या हंगामी पावसामुळे अफगाणिस्तानमध्ये अचानक पूर आला. या भीषण पुरात किमान १८२ लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत.
तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद म्हणाले, ‘अचानक आलेल्या पुरात २५० हून अधिक लोक जखमी झालेत, तर ३ हजारहून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत.
युनायटेड नेशन्सच्या म्हणण्यानुसार, इतर ३० जण बेपत्ता आहेत. त्याच वेळी १३ प्रांतातील ८,२०० हून अधिक कुटुंबांना पुराचा फटका बसला आहे.
पूर्व लोगर प्रांतातील खुशी जिल्ह्यातील गावकऱ्यांनी सांगितले की, या प्रदेशात प्रथमच पूर आला आणि जनावरं, घरं आणि शेतजमीन नष्ट झाली. लोकांना आपली घरे सोडावी लागली आहेत. सर्व लोकांनी उंच डोंगरावर आश्रय घेतला आहे.