मालवण (प्रतिनिधी) : पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या देवबाग गावातील त्सुनामी आयलंड पुनर्जीवित करण्यासाठी दत्ता सामंत यांनी भाजप नेते निलेश राणे यांचा माध्यमातून पुढाकार घेतला आहे. देवबाग संगम परिसरातील कर्ली खाडीपात्रातील गाळ उपसा व्हावा यासाठी सक्शन ड्रेझर मशीन शासन स्तरावरून उपलब्ध करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, अशी मागणी दत्ता सामंत यांच्या वतीने निलेश राणे यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी मंदार लुडबे व अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
मालवण देवबाग गावात पर्यटन जलक्रीडा मोठ्या प्रमाणात करण्यात येतो आणि स्थानिक पर्यटन व्यावसायिक आपला उदरनिर्वाह त्या व्यवसायावर करतात. पण यंदा समुद्राच्या उलट प्रवाहामुळे पर्यटन व्यवसाय धोक्यात आहे. समुद्राचा भू-भाग प्रमाणापेक्षा वाहून गेला आहे त्यामुळे खाडीतील गाळ जर देवबाग संगमावरील बेटावर टाकला, तर पर्यटन व्यवसायिकांना भरपूर फायदा होईल.
तारकर्ली खाडीत असणारा ड्रेजर जर देवबाग खाडीत गाळ उपसा करण्याकरीता दिला, तर देवबाग संगम आणि त्सुनामी आयलंड मोठ्या प्रमाणात विकसित होईल आणि पर्यटन व्यवसायिक आणि पर्यटक सुरक्षित राहतील. तरी आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करून तारकर्ली बंदरातील ड्रेजर देवबाग खाडीत मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.