मुंबई (प्रतिनिधी) : मालाड येथील मढ परिसरात तिरुपती बालाजी स्टुडिओत शुक्रवारी भाजपचे आमदार, खासदार यांनी बेकायदेशीर सुरू असलेल्या शूटिंग विरोधात आवाज उठवल्यानंतर मुंबई महापालिकेने हे शूटिंग आणि इतर वापर करण्यास बंदी असल्याचे आदेश दिले आहेत.
मालाडच्या मढ येथे तिरुपती बालाजी स्टुडिओत सुरू असलेले शूटिंग बेकायदेशीर, अनधिकृत बांधकाम देखील केले आहे, तर पर्यावरण विभागाने कारवाईचे आदेश दिल्यानंतर देखील शूटिंग सुरू असल्यामुळे भाजपचे आमदार अतुल भातखलकर, खासदार गोपाळ शेट्टी आणि नेते किरीट सोमय्या पालिका अधिकारी आणि सीआरझेड अधीकारी यांच्या समवेत स्टुडिओत आले, दरम्यान आमदार अतुल भातखलकर यांनी हे शुटिंग बेकायदेशीर असून सर्व कायद्याचे उल्लंघन केले असल्याचा आवाज विधानसभेत ही उठवला होता, मात्र तरीही त्यावर कारवाई झाली नाही. यामुळे भाजपच्या आमदार खासदारांनी आणि अधिकाऱ्यांनि हे शूटिंग बंद पाडले.
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर मुंबई महापालिकेने तिरुपती बालाजी स्टुडिओतील शूटिंग तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत पालिकेच्या पी उत्तर विभागाने नोटीस दिली आहे. मारवे येथील भाटी गावच्या परिसरात शेडसेट बनविण्यासाठी पालिकेने परवानगी दिली होती ही परवानगी २ मार्च २०२१ रोजी तात्पूर्ती दिली होती. त्यानंतर या परवानगीचे १२ ऑक्टोबर २०२२ पर्यंत नूतनीकरन करण्यात आले आहे, तर ज्यावेळी या स्टुडिओसाठी पहिल्यांदा परवानगी देण्यात आली त्यावेळी ‘एमसीझेडएमए’ पर्यावरण विभागाकडून शिफारस प्राप्त झाली होती. त्यानंतर पुन्हा नूतनीकरणासाठी एमसीझेडएमए पर्यावरण विभागाला अर्ज केला होता. मात्र आता स्टुडिओकडे एमसीझेडएमए, पर्यावरण विभागाकडून परवानगीचे कोणतेही कागदपत्रे सादर करण्यात आलेले नसल्यामुळे तत्काळ शूटिंगसह सर्व वापर बंद करण्यात यावा, अन्यथा आपल्यावर महानगरपालिकेच्या अधिनियमाप्रमाणे उचित कारवाई करण्यात येईल, असे आदेश देण्यात आले आहेत.
आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांच्यामुळे हजार कोटींचा घोटाळा : किरीट सोमय्या
मालाडच्या माढ येथील तिरुपती बालाजी स्टुडिओ बांधकामप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील नेते आदित्य ठाकरे आणि असलम शेख यांच्यावर आरोप केले आहेत. आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांच्या दादागिरीमुळे १००० कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
दरम्यान पर्यावरण कायद्यानुसार परवानगीशिवाय मढसारख्या परिसरात बांधकाम करू शकत नाही, असे असतानाही आदित्य ठाकरे अस्लम शेख यांनी प्रशासनाचा वापर करून आणि दादागिरी करून बांधकाम करून १ हजार कोटींचा घोटाळा केला आहे तसेच याबाबत बांधकाम पाडण्यासाठी नोटिसा देऊनही बेकायदेशीर बांधकाम काढण्यात आले नसल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
तसेच महाविकास आघाडी सरकार असताना २०२१ मध्ये आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांनी त्या जागेला भेट देखील दिली असल्याचे सोमय्या म्हणाले आहेत. तर यात १ हजार कोटींचा घोटाळा झाला असून याप्रकरणी स्टुडिओच्या मालकावर ही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.