अहमदनगर : शिर्डीच्या साईबाबा मंदिरात कोरोना काळात हार-फुले घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली होती. हा नियम अद्यापही कायम असल्याने ग्रामस्थ आणि विक्रेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.
शिर्डी ग्रामस्थांनी आज हार-फुले घेऊन मंदिरात प्रवेश केला तेव्हा त्यांनी मंदिराच्या सुरक्षारक्षकांनी अडवले. तेव्हा ग्रामस्थ आणि सुरक्षारक्षांकमध्ये झटपट झाली. तसेच, सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी आंदोलन सुरू केले. मात्र, कायदा सुव्यवस्थेचे कारण देत संस्थानने आंदोलन न करण्याची विनंती केली.
शिर्डीच्या साईबाबा मंदिरात रोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. तसेच, सण-उत्सवांच्या वेळेस लाखो भक्त साईबाबा मंदिरात येतात. त्यामुळे आजूबाजूला स्टॉल लावणाऱ्या फुल विक्रेत्यांचा या काळात चांगला व्यवसाय होतो. मात्र, कोरोना काळात हार-फुले घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली होती. ती बंदी अजूनही उठवण्यात आली नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी कोपरगाव ते शिर्डी येत द्वारकामाईसमोर आंदोलन केले.