नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी आप आमदारांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीला ९ आमदार गैरहजर होते. बैठकीनंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आपचे सर्व आमदार महात्मा गांधींचं स्मारक असलेल्या राजघाटावर पोहोचले आणि त्यांनी स्मारकाला वंदन केलं.
उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचं कौतुक करताना अरविंद केजरीवाल म्हणाले, “मी मागच्या जन्मात चांगली कामं केली असतील, त्यामुळं आज मला मनीष सिसोदियांसारखा जोडीदार मिळाला. त्यांनी भाजपची ऑफर धुडकावून लावली. आता ते आमच्या (आप) आमदारांना पैसे देऊन भाजपमध्ये येण्याची ऑफर देत आहेत. मला माहिती मिळाली आहे की, भाजप प्रत्येक आप आमदाराला २० कोटी रुपयांमध्ये विकत घेत घेण्याचा प्रयत्न करत आहे.
केजरीवाल पुढं म्हणाले, “माझ्या एकाही आमदारानं त्यांचा प्रस्ताव स्वीकारला नाही याचा मला आनंद आहे. मला दिल्लीतील जनतेला सांगायचं आहे की, तुम्ही एका प्रामाणिक पक्षाला मतदान केलंय. आम्ही मरु, पण देशातील जनतेची फसवणूक कधी करणार नाही.”